सांस्कृतिक कार्यक्रमांना पर्यटकांचीदेखील गर्दी
कर्जत : बातमीदार : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने कोकणवासिय समाज या संस्थेने विर भाई कोतवाल प्राथमिक शाळा व असेंम्बली हॉलच्या प्रांगणात कोकण महेत्सवाचे दिमाखदार आयोजन केले होते. या दोन दिवसीय महोत्सवात अनेक बहारदार कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात कोकणवासिय तरुण तरुणींनी सहभाग नोंदवून लावणी, कोळी नृत्य, नमन, जादुचे खेळ, बोलक्या बाहुल्यांचा खेळ, हास्य कलोळ तसेच वेगवेगळे नृत्याचे अविष्कार सादरीकरण करुन उपस्थितांची दाद मिळवली.
या कोकण महोत्सवाची सुरुवात शानदार शोभायात्रेने करण्यात आली. कोकणवासिय अबालवृद्ध पारंपरिक वेशभुषा आणि फेटे परिधान करुन शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात महिला लेझीम तसेच काही मंडळी टाळमृदुंगाच्या तालावर पालखी नाचवत होती. काहीं मंडळी रस्त्यावर फुगड्यांचे फेर धरत आंनदोत्सव साजरा करीत होते. यावेळी माथेरान बाजारपेठ अगदी फुलून गेल्याने पर्यटकांनादेखील या कोकण महोत्सवाचे साक्षिदार होता आले.
कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांच्या हस्ते या कोकण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, गटनेते प्रसाद सावंत, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक विश्वनाथ राणे, कोकणवासिय समाजाचे माजी अध्यक्ष बाळ भागवत दळवी, सुनिल सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती.
राष्ट्रीयस्तरावरील आदर्श शिक्षक सुनिल कदम तसेच सुनिता लोखंडे, दिपक सावंत, अंकेश ठक्कर यांच्यासह माथेरानमधील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा या महोत्सवात कोकणवासिय समाजाच्या वतीने पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. लकी ड्रा स्पर्धेमुळे महोत्सवाला वेगळीच रंगत आली होती. त्यात आकर्षक बक्षिसे मिळविण्याकरीता अनेकांनी गर्दी केली होती. तर मुंबईतील बाळा पांचाळ यांनी रांगोळ्यांच्या माध्यमातून कोकणाच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. कोकणातील खाद्य पदार्थांची लज्जत चाखण्यासाठी महोत्सवातील खाद्य जत्रेचे स्टॉल पर्यटकांनी फुलून गेले होते. महोत्सवात साकारलेली गावाकडची झोपडी सर्वाचे सेल्फीस्पॉटसाठी आकर्षण ठरत होती.
माथेरान पर्यटनस्थळावर पहिल्यांदाच आयोजित केलेला हा कोकण महोत्सव यशस्वी करण्यासाठी कोकणवासिय समाजाचे अध्यक्ष शैलेंद्र दळवी, केतन रामाणे, चंद्रकांत सुतार, दत्ता सनगरे, संतोष खाडे, योगेश दळवी, रविंद्र परब यांनी तसेच त्यांच्या अनेक सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुंबई, ठाण्यात आम्ही कोकण महोत्सव पाहिलेला आहे. मात्र माथेरानसारख्या पर्यटन स्थळावर कोकण महोत्सव पाहताना आनंद वाटला. कोकणातील कौटुंबिक सोहळ्याचे स्वरुप अनुभवयाला मिळाले. त्यातील अबालवृद्धांचा सहभाग, लहानग्यांचे नृत्य अविष्कार पाहून आम्ही भारावून गेलो. असा महोत्सव दरवर्षी होणे अपेक्षित आहे.
-निलम दळवी, पर्यटक, डोंबिवली