कळंबोली : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा खासदार करून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक 1-2मधून जास्तीत जास्त मतदान महायुतीला कसे होईल यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे नगरसेवक संतोष भोईर यांनी प्रचारादरम्यान सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या पनवेल तालुक्यातील प्रचार दौर्यांचे जनतेतून स्वागत होत असून त्यांना पाठिंबा दर्शविताना त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी जनता घेत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नगरसेवक संतोष भोईर यांनी व्यक्त केला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील देवीचापाडा येथून महायुतीचे उमेदवार बारणे यांच्या प्रचार दौर्याला सुरुवात झाली. या प्रचार फेरीदरम्यान सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या विभागातील पालेखुर्द, शिरवली, खेरणे, नितलस, घोट, पेदर तोंडरे, नावडे, कानपोळी, वलप अशा सर्व गावांतील घराघरात भेट देऊन मतदारांना या देशासाठी मोदी सरकारची गरज आहे. त्यासाठी आपण बारणेंच्या रूपाने शिलेदार पाठवायचा आहे. त्याचबरोबर बारणे यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडून महायुतीचे सरकार देशात का असायला पाहिजे हे पटवून सांगत होते. त्यावेळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेसाठी केलेली लोकहिताची कामे याचा फायदा बारणे यांना होणार आहे. या वेळी महायुतीचे उमेदवार बारणे यांना विविध सामाजिक संघटना व संस्थांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. सर्व समाजातील जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे आप्पा बारणे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय होईल, असा विश्वास नगरसेवक संतोष भोईर यांनी प्रचार सभेदरम्यान व्यक्त केला.