ग्रंथालयात संविधान विशेष दालनाचा शुभारंभ
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 15 येथील ग्रंथालयात 18 विषयांनुसार तीन हजारांहून अधिक ग्रंथांची विषयनिहाय आकर्षक मांडणी केलेली आहे. यामध्ये अधिक सुनियोजितता आणत संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयामध्येच ‘संविधान विशेष‘ स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. या दालनाचा शुभारंभ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, लेखक व वक्ते सुरेश सावंत, शिक्षणाधिकारी अरूणा यादव, ठाणे जिल्हा समाजकल्याण विभाग सहा. आयुक्त समाधान इंगळे, कार्यकारी अभियंता विद्युत प्रवीण गाढे उपस्थित होते. माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे, अब्दुल जब्बार खान व इतर मान्यवर व्यक्तींनीही याप्रसंगी उपस्थित राहून ‘संविधान विशेष’ दालनाच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक केले. सर्वसाधारण ग्रंथालयांप्रमाणे कपाटांमध्ये ओळीने पुस्तके मांडून न ठेवता या ग्रंथालयातील वेगळ्या स्वरूपाच्या रॅकमध्ये त्यांची अत्यंत आकर्षक स्वरूपात मांडणी केल्याचे लक्षात येते आणि वाचक त्या ग्रंथालयाच्या प्रेमात पडतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केलेली आहे. ग्रंथालयात सहा स्क्रीन टच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त संगणक ठेवण्यात आले असून त्यामध्ये ऑडिओ बुक्स तसेच ई बुक्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याशिवाय बाबासाहेबांची दुर्मिळ व्हिडिओ तसेच त्यांच्यावरील विचार मालिकाही या स्क्रीनवर पाहता येतात. संविधान विशेष दालनातील ग्रंथसंपदेसोबतच ग्रंथालयातील संगणकांवर संविधानविषयक चित्रफिती तसेच संविधान निर्मितीच्या काळात वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तांची स्कॅन कात्रणेही अभ्यासकांना बघता येणार आहेत. त्याही सुविधेचा शुभारंभ आयुक्तांनी यावेळी केला. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू होत असलेले ग्रंथालयातील ‘संविधान विशेष’ हे दालन वाचक आणि अभ्यासकांसाठी एक मौलिक ठेवा असल्याचे सांगत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या दालनाचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
रिसमध्ये संविधान दिनानिमित्त प्रबोधन; सम्यक सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम
मोहोपाडा : 26 नोव्हेंबर 1950 रोजी स्विकारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे औचित्य साधून भारत सरकार ने 19 नोव्हेंबर 2015 रोजी राजपत्र अधिसूचना द्वारा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन घोषित करण्यात आला. संविधान दिनानिमित्त या वेळी देशभरात विविध ठिकाणी संविधान दिन साजरा करत असताना सम्यक सामाजिक संस्थेच्या रिस येथील कार्यालयातदेखील संविधान दिन उत्साहात झाला. या वेळी प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. तथागत गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या व संस्थेच्या सभासदांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थितांकडून संविधान उद्देशीकेचे वाचन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती कशाप्रकारे केली? व स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही नीतीमुल्ये संविधानात अमलात आणून संपूर्ण मानव जातीला समानतेचा हक्क आणि अधिकार कशाप्रकारे मिळाला? यावर संस्थेच्या सर्व सभासदांनी सविस्तरपणे आपापली मनोगते मांडली. संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून संविधानाचा उद्देश कशाप्रकारे मांडण्यात आला आहे तसेच संविधान हे भारतातील कायदेप्रणालीत सर्वोच्चस्थानी कशाप्रकारे आहे याचे विस्तारित रूपांतर सुजित सोनावळे यांनी केले. संविधानातील घटनाक्रम, संविधानाची रचना, संविधानातील माहिती व अधिकार याबाबत प्रमुख व्याख्यान व्याख्याते सुजित सोनावळे यांनी उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधान गीत गायन करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला. या वेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, दिपक इंगळे, अजित कडलक, मोहन कांबळे, दयानंद सरवदे, फुलचंद लोंढे, संपत पाठारे, संदीप वानखडे, अशोक सोनावणे, सुजित सोनवळे, कृष्णा झोँबाडे, गणेश जावळे, हिंदुराव बाबर, श्रीकांत धुळणकर आणि पत्रकार राहुल जाधव आदी उपस्थित होते.
नेरूळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयतर्फे संविधान दिन साजरा
नवी मुंबई : नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघ संस्थेच्या सार्वजनिक ग्रंथालयतर्फे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान दिन संघाच्या सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर शं. पा. किंजवडेकर यांच्या प्रतिमा आणि संविधान ग्रंथाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कमल आंगणे आणि रमेश गायकवाड यांनी सुरेल शारदा स्तवन सादर केल्यानंतर पी. आर. गुप्ता यांनी घटनेच्या उद्येशिकेचं वाचन केले. प्रमुख पाहुणे व संविधानाचे नामवंत अभ्यासक नागेश धोंडगे आणि ज्येष्ठ विधितज्ञ अॅड. शारदा शहा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा वाळवेकर उपस्थित होत्या. नागेश धोंडगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शारदा शहा आदींची या वेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष विकास साठे, तसेच प्रास्ताविक करताना घनश्याम परकाळे यांनी केले. ग्रंथालय सचिव आणि या विशेष कार्यक्रमाच्या कर्ताधर्ता सीमा आगवणे यांनी सर्वांचे आभार मानले. राज्यघटनेची ’प्रतिज्ञा’ कुमारी उल्का सावंत हीने सादर केली. दत्ताराम आंब्रे, रमेश गायकवाड, प्रभाकरराव गुमास्ते, रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी, विजय सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याची माहिती सुभाष हांडे देशमुख यांनी दिली.
वाजेकर कॉलेजमध्ये कायदेविषयक कार्यशाळा
उरण : राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग आयोजित सविंधान दिनानिमित्त कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. कर्मवीर भाऊराव पाटील, वीर वाजेकर व संविधान प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भित्तीपत्रकेचे अनावरण प्राचार्य, डॉ. पी. जी.पवार, अॅड. किशोर ठाकूर, धीरज डाकी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप घोडके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य, डॉ. विलास महाले यांनी करून दिला. किशोर ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून राज्यघटनेची ओळख करून दिली. धीरज डाकी यांनी आदिवासींच्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटना व भारतीय नागरिक यांच्या साठीचे महत्त्व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी. जी. पवार यांनी आपले मत मांडले. प्रा. चिंतामण धिंदळे यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. श्रीकांत गोतपगार यांनी मानले. प्रा. राम गोसावी, प्रा. दिलीप केंगार, प्रा. योगेश कुलकर्णी, डॉ. आमोद ठक्कर, प्रा. इनामदार, प्रा. रत्नमाला जावळे, प्रा.रश्मी पुरके, डॉ. स्मिता तांदळे, डॉ. झेलम झेंडे, प्रा. चारुशीला भगत उपस्थित होते. अविनाश पाटील व कार्यलयीन सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची पूर्व तयारी रा.से.यो.प्रतिनिधी मयूर पाटील तसेच दीपेन, तांडेल, दीपेश तांडेल, मंदिरा म्हात्रे, तन्वी म्हात्रे, आरती सुरवसे, महेश वाघमारे, विशाल खरात यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे 110 स्वयंसेवक उपस्थित होते.
निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या गुणवंतांचा गौरव
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ऐरोली सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झाला. या वेळी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, लेखक व वक्ते सुरेश सावंत, शिक्षणाधिकारी अरूणा यादव, ठाणे जिल्हा समाजकल्याण विभाग सहा. आयुक्त समाधान इंगळे आदींच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून स्पर्धा विजेत्यांचा गौरव करण्यात आला. निबंध स्पर्धेत नमुंमपा शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 289 स्पर्धकांमधून शाळा क्र. 20 तुर्भेगांवची विद्यार्थिनी श्रावणी उंबरकर तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 225 स्पर्धकांमधून शाळा क्र. 103 ऐरोलीची विद्यार्थिनी हर्षदा हारुगडे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. खाजगी शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 259 स्पर्धकांमधून श्रीराम विद्यालय ऐरोलीची विद्यार्थिनी अनुष्का भैय्ये तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 316 स्पर्धकांमधून ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणेची विद्यार्थिनी प्रणाली जाधव या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. महाविद्यालयीन गटात सहभागी 7 स्पर्धकांमधून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशीची विद्यार्थिनी सायली कांबळे तसेच खुल्या गटात सहभागी 153 स्पर्धकांमधून विश्रांती चांगण या पहिल्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रत्येक गटात प्रथम 3 क्रमांक आणि 2 उत्तेजनार्थ अशी 5 पारितोषिके प्रदान करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत नमुंमपा शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 136 स्पर्धकांमधून शाळा क्र. 78 गौतमनगरची विद्यार्थिनी अंशीका यादव तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 97 स्पर्धकांमधून शाळा क्र. 106 कोपरखैरणेची विद्यार्थिनी तनुजा पाटील या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. खासगी शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 133 स्पर्धकांमधून नवी मुंबई विद्यालय, वाशीची विद्यार्थिनी नितु सोलंकी तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 118 स्पर्धकांमधून संजिवनी विद्यालय, दिघा चा विद्यार्थी अभिजीत डोळस हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. घोषवाक्य स्पर्धा अनेक स्पर्धकांच्या घोषवाक्य साम्यामुळे रद्द करण्यात आली. शालेय स्तरावरील निबंध स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक काळुराम जाधव, संजय उबाळे, मनिषा जाधव, श्री. युवराज खंदारे, मधुकर वारभुवन, राजकुमारी इंदलकर तसेच खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक रविंद्र पाटील यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या परीक्षक पुर्वा पाटोळे, गौरी इठणकर, श्रीम. मनिषा पाटणे यांचाही सन्मान करण्यात आला. निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यातून 1733 इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक यांनी संविधानाचा बारकाईने विचार केला, अभ्यास केला व त्यावर आपली मते मांडली हे या स्पर्धेचे यश असून स्पर्धा आयोजनापाठीमागील उद्देश सफल झाल्याची भावना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली व सर्वांचे अभिनंदन केले.