पनवेल : प्रतिनिधी
ज्यांना कोणाला शास्त्रज्ञ व्हायचे असेल त्यांनी गणिताकडे लक्ष द्यावे. कारण या क्षेत्रात गणिताला खूप महत्त्व आहे. यासोबतच तुमची उत्सुकता मरून देऊ नका. तुमचे आई-वडील किंवा शिक्षकांकडून उत्तरे मिळत नसतील तर तुमच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यातून गुगल किंवा फेसबुकद्वारे ती शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची उत्सुकता वाढेल. तुम्हाला नवीन आयडिया सुचतील. नवीन संशोधन होईल. आपल्याकडे संशोधन खूप कमी होतात. त्यामुळे संशोधनकडे वळा, संशोधन करा, असे आवाहन रायगडमधील संशोधक प्रज्ञेश म्हात्रे यांनी गुरुवारी (दि. 8) येथे आयाजित एका कार्यक्रमात केले.
प्रज्ञेश म्हात्रे पेण येथील रहिवासी असून त्यांनी कारमेल हायस्कूलमधून एसएससी झाल्यावर प्रायव्हेट हायस्कूलमध्ये 12वी सायन्स केले. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या सिंहगड टेक्नोलोजी इन्स्टिट्यूट, लोणावळा येथून मॅकेनिकल इंजिनियरिंग केले. आता मास्टर आणि पीएचडीसाठी यूएसमध्ये आरीओना युनिव्हार्सिटीमध्ये प्रवेश घेतला. आपला संशोधकाचा प्रवास सांगताना संगितले की, पहिल्यापासूनच मला सायन्सची आवड होती. 6वीत असताना आमच्या येथे उंबरडे येथे सायन्स प्रदर्शन लागले होते, त्यामध्ये दुर्बिण वगैरे होती. त्यातून मी पहिल्यांदा शनि ग्रह पाहिला आणि मग मला खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली. मी ठरवले की काही करायचे झाले तर स्पेस सायन्समध्येच करायचे.
त्यावेळी आपल्याकडे फारशी या क्षेत्राची कोणाला माहिती नव्हती. मग माझ्या मुंबईला असलेल्या काकांना सांगितले की, मला त्यासंबंधी एखादे पुस्तक आणून द्या म्हणजे मी सुरुवात करू शकेन. त्यांनी मला एक बेसिक खगोलशास्त्राची माहिती असणारे पुस्तक आणून दिले. त्यामध्ये सोलार सिस्टीम व त्याच्या पलिकडे काय आहे, युनिव्हर्स काय आहेत, ब्लॅक होल काय याची माहिती मिळाली. त्याच वेळी वर्तमानपत्रात येणार्या खगोलशास्त्रीय माहितीची कटींग काढून डायरीत नोट करून ठेवू लागलो.
त्यानंतर मला पहिल्यांदा ज्यावेळी 11वीत असताना मोबाईल मिळाला, त्यावेळी मी गुगल करून कोणाशी संपर्क करू शकतो याची माहिती घेऊ लागलो. फेसबुकच्या माध्यमातून ही मी खूप लोकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून माझी ओळख स्टार गेझिंग मुंबईमध्ये अरविंद परांजपे यांच्याशी झाली. स्टार गेझिंग मुंबई हे स्टार गेझिंग करते ज्यामध्ये टेलिस्कोप वगैरे येतो. त्याठिकाणी अरविंद परांजपे मार्गदर्शक म्हणून यायचे. त्यांना भेटून मी चर्चा केली. मग त्यांनी मला गाईड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मला सुचवण्यात आले की, तू रिसर्च पेपर लिहायला घे. मग मी ते शिकायला लागलो. रिसर्च पेपरकसे लिहितात आणि ते पब्लिश कोठे करतात कारण ते पब्लिश होणे महत्त्वाचे आहे. हे करीत असताना माझी नासामध्ये असलेल्या रवी मार्ग सहायम यांची भेट झाली. जवळपास 100 उपग्रह व कल्पना चावला असलेले यान अंतराळात सोडण्याचा त्यांना अनुभव असलेली व्यक्ती मला गाईड म्हणून भेटली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संशोधन करून रिसर्च पेपर लिहायला लागलो. त्यांच्यामुळे या क्षेत्रात कसे पाऊल ठेवावे याचा मार्ग सापडला आहे. या क्षेत्रात पुढे काय आहे आणि काय करू शकतो याची माहिती मिळाली. दहा वर्षे मला या क्षेत्रात कसे यायचे याची माहिती घेण्यात गेले. ही अडचण या मुलांना होऊ नये यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत.
आतापर्यंत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आयटीमध्ये संधी उपलब्ध होत असल्याने प्रत्येक जण त्या क्षेत्रात जात होता, पण यापुढे भविष्यात स्पेस इंडस्ट्रीमध्ये संधी उपलब्ध होणार आहे. मुलांना या स्पेस इंडस्ट्रीमध्ये कसे योगदान देता येईल याबद्दल सांगताना त्यांनी तुम्ही ज्या काय नवीन गोष्टी करताय, नवीन संशोधन करताय त्या युनिक असतील तर त्याचे डाक्युमेंटेशन करा म्हणजे ते तुमच्या नावे होते. पुढे त्यामध्ये जे काही नवीन संशोधन होईल त्याला फंडिंग मिळेल. तेव्हा त्यातून तुम्हाला उत्पन्नही मिळेल आणि सोबत संशोधन ही होईल. आपल्याकडे संशोधन खूप कमी होतात. त्यामुळे तरूणांनो संशोधनकडे वळा, संशोधन करा त्यातून तुम्हाला जॉब मिळू शकेल. आपल्याकडे त्या क्षेत्रातील माहिती देणाराही कोणी नव्हता त्यामुळे मला खूप संघर्ष करावा लागला. आताच्या मुलांकडे मोबाईला असल्याने त्यांना खूप सोपे झाले आहे. त्याचा वापर करून आपला मार्ग निवडा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …