Breaking News

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने घातला गंडा

पनवेल ः वार्ताहर

बजाज फायनान्स कंपनीकडून सात लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने कळंबोलीत राहणार्‍या व्यक्तीला 70 हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी सायबर चोरट्यांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार संजयकुमार जाधव (58) कळंबोलीतील रोडपाली भागात राहण्यास असून, प्रियम झा नावाच्या व्यक्तीने गोरेगाव येथील बजाज फायनान्स कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. प्रियम झा याने कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून आधार कार्ड आणि पॅनकार्ड मागवून घेतले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रियम झा याने पुन्हा जाधव यांना संपर्क साधून इन्शुरन्स पॉलिसी गहाण ठेवून सात लाख रुपये इतके कर्ज मंजूर होऊ शकते, असे त्यांना सांगितले, तसेच पॉलिसी काढण्यासाठी कर्जाच्या 10 टक्केप्रमाणे दोन टप्प्यात पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर जाधव यांनी त्याच दिवशी 35 हजार रुपये प्रियम झा याने दिलेल्या फिनो बँकेच्या खात्यात गुगल पेद्वारे पाठविले.

प्रियम झा याने कर्जाचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर दुसरा हप्ता भरण्यास सांगितले. त्यावेळी झा याने त्याच्या नावाचे बजाज फायनान्स कंपनीचे ओळखपत्र, कंपनी कार्यालयातील फोटो, पॅनकार्ड आणि बजाज फायनान्स कंपनीचे जाधव यांच्या नावाचे कर्ज मंजूर केलेले पत्र जाधव यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर बँकेचा व्हेरीफिकेशन कॉल असल्याचे भासवून त्याच टोळीतील दुसर्‍या ठकसेनाने जाधव यांना संपर्क साधून त्यांची माहिती विचारली, तसेच उर्वरित 35 हजार रुपये भरल्याशिवाय पॉलिसी तयार होणार नसल्याचे आणि कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी आणखी 35 हजार रुपये प्रियम झा याच्या खात्यावर पाठवून दिल्यानंतर झा याने दोन दिवसात त्यांचे पैसे येतील असे सांगितल, आजपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे जाधव यांनी बजाज फायनान्स कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधून चौकशी केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर जाधव यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply