Breaking News

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक

अज्ञात टोळीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर

ऑनलाइन फसवणूक करणार्‍या टोळ्यांनी आता सोशल माध्यमांचा वापर करून नातेवाईक अथवा मित्र असल्याचे भासवून समोरील व्यक्तीकडून ऑनलाइन पैसे उकळण्याचे प्रकार सुरू केले आहेत. असाच प्रकार पनवेलच्या सुकापूर भागातील तरुणासोबत नुकताच घडला. अज्ञात टोळीने तरुणाच्या मामाच्या फोटोचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 38 हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणात फसवणूक झालेला अभिषेक पांडे (29) हा तरुण पनवेलच्या सुकापूर भागात राहत असून त्याचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. अभिषेकचा मामा नितेश पांडे हा कर्नाटकात बंगलोर येथे कुटुंबासह राहत असून त्यांच्याकडे मोबाइलचे वेगवेगळे नंबर आहेत. यातील मुख्य नंबरवर अभिषेक नियमित आपल्या मामासोबत व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅटिंग तसेच संपर्क साधत होता. अभिषेकचा मामा त्याच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या नंबरवरून अभिषेकशी संपर्क साधत होता. याचाच फायदा ऑनलाइन फसवणूक करणार्‍या टोळ्यांनी घेतला. या टोळीने अभिषेकचा मामा नितेश पांडे यांच्या फोटोचा वापर करून अभिषेकचा मामा असल्याचे भासवून अज्ञात नंबरवरून अभिषेकसोबत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच अभिषेकला मित्राला हॉस्पिटलमध्ये पैशांची अर्जंट गरज असल्याचे व गुगल पेच्या माध्यमातून अर्जंट पैसे पाठविण्याबाबत मेसेज पाठविला. दुसर्‍या दिवशी सकाळी सदर पैसे परत करण्याबाबतही मेसेज पाठविला.

व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर अभिषेकच्या मामाचा फोटो असल्याने हा मेसेज नितेश पांडे यांनीच पाठविल्याचा समज झाल्याने अभिषेकने सदर मोबाइल नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नंबर न लागल्याने अभिषेकने त्यांना किती पैसे पाठवायचे असा मेसेज पाठविला असता समोरून प्रथम 18 हजार व त्यानंतर 10-10 हजार रुपये अर्जंट पाठविण्यास सांगितले. त्यानुसार अभिषेकने तत्काळ दोन वेळा 38 हजार रुपये पाठवले. समोरील व्यक्तीने पुन्हा 22 हजार पाठविण्याचा मेसेज पाठविला. त्यानुसार अभिषेकने पुन्हा 22 हजार रुपये ऑनलाइन पाठवले, मात्र सदरची रक्कम न गेल्याने ती रक्कम दोन दिवसांनंतर अभिषेकच्या खात्यात परत आली.

दरम्यान, अभिषेकने पाठविलेली रक्कम मामाने परत न पाठवल्याने अभिषेकने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. या वेळी नितेश पांडे यांनी अभिषेकला कुठलाही मेसेज पाठविला नसल्याचे सांगितले. अभिषेकने त्याला मेसेज पाठविणार्‍या व्यक्तीकडे पैशांची मागणी केली असता समोरील व्यक्तीने त्याची फसवणूक केल्याचे सांगून तो त्याला ओळखत असल्याचे तसेच 15 दिवसांत पैसे परत करणार असल्याचे सांगितले. आपली अज्ञात व्यक्तीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने खांदेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply