थ्री आर संकल्पनेच्या कार्यवाहीला सुरुवात
नवी मुंबई : बातमीदार
केंद्र सरकारने ‘21 दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम दि.15 मे ते 05 जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले असून यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात – कचरा कमी करणे (रेड्यूस), कचर्याचा पुनर्वापर करणे (रियूज) व कचर्यावर पुनर्प्रक्रिया करणे (रिसायकल) असून या उपक्रमांतर्गत शहरामध्ये ‘थ्री आर’ सेंटर्स सुरु करणे व नागरिकांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. यातील विशेष बाब म्हणजे स्वच्छतेविषयी जागरुक असणार्या नवी मुंबई महापालिकेने याविषयीच्या कार्यवाहीला आधीपासूनच सुरुवात केलेली आहे असे सांगत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘21 डेज चॅलेंज’ साठी नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसह सज्ज असल्याचे सांगितले.
महापालिका मुख्यालयातील म्फिथिएटरमध्ये आयोजित विशेष समारंभात ‘21 डेज चॅलेंज’ अंतर्गत ‘थ्री आर’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त अनंत जाधव, महापालिका सचिव श चित्रा बाविस्कर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेने ‘थ्री आर सेंटर्स’ ही संकल्पना यापूर्वीच शहरातील विविध विभागात 92 ठिकाणी राबविण्यास सुरुवात केली असून ‘नको असेल ते द्या व हवे असेल ते घ्या’ या संकल्पनेवर आधारित या सेंटर्संना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सुरु असलेल्या सेंटर्सच्या कार्यप्रणालीमध्ये जाणवलेल्या काही त्रुटी दूर करून उपक्रम कालावधीत ही सेंटर्स अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.बिसलरी कंपनीसोबत ‘बॉटल फॉर चेंज’ हा अभिनव उपक्रम, ‘एच न्ड एम’ व काही इतर इंटरनॅशनल ब्रँडसोबत जुने कपडे घेऊन ग्राहकांना नवीन कपडे खरेदी करताना किंमतीवर सवलतीच्या रुपात पॉईंट्स देण्याची अभिनव संकल्पना मागील काही वर्षांपासून नवी मुंबईत यशस्वीपणे राबविली जात असल्याचेही ते म्हणाले.
सर्वांत महत्वाचे म्हणजे झोपडपट्टयांमधील कचर्याचे संकलन करून त्याची तेथेच विल्हेवाट लावणारा ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ हा प्रकल्प 5 झोपडपट्टयांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून त्याची इतर झोपडपट्टयांमध्ये व गावठाण भागात अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी या वेळी सांगितले. या संकल्पनेस राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सर्वच शाळांमध्ये राबविण्याचे नियोजन
‘थ्री आर’ चे महत्व नव्या पिढीत अर्थात विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी नवी मुंबई महापालिका आधीपासूनच कृतीशील असून त्यादृष्टीने ‘ड्राय वेस्ट बँक’ सारखा अभिनव उपक्रम शाळांमध्ये राबविला जात आहे. सध्या बेलापूर विभागातील 6 शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक स्वरुपात राबविण्यास सुरुवात झालेली असून या उपक्रमास विद्यार्थी व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यापुढील काळात हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ हे घोषवाक्य घेऊन केंद्र सरकारमार्फत ‘21 डेज चॅलेंज’ – ‘थ्री आर’ हा उपक्रम जाहीर करण्यापूर्वीपासूनच नवी मुंबई महापालिकेमार्फत त्यादृष्टीने अनुषांगिक कार्यवाही केली जात असून यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळत आहे. त्यामुळे 15 मे ते 05 जून या कालावधीत ‘थ्री आर’ उपक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्व नवी मुंबईकर मिळून सर्वोत्तम कामगिरी करूया. -राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई मनपा