बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या कथित आरोपांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी (दि. 8) उच्च न्यायालयात दिली. विशेष म्हणजे या आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवल्यावर सरकारतर्फे ही माहिती देण्यात आली. त्यामुळे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचा आरोप ठाकरे यांच्यातर्फे करण्यात आला.
दादरस्थित गौरी भिडे यांनी ही याचिका केली आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने याचिका केल्याचा दावा भिडे यांनी केला आहे. न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी याचिककर्ती आणि ठाकरे कुटुंबीयांचे थोडक्यात म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला, मात्र त्यानंतर आपली बाजू ऐकण्यात आली नाही, असे सांगताना या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने भिडे यांनी केलेल्या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला दिली.
त्यावर आपल्याला याबाबत काहीच कळवण्यात आलेले नाही, असे भिडे यांनी न्यायालयाला सांगितले, तर या टप्प्यावर तक्रारदाराला कळवण्यात येत नसल्याचे पै यांनी म्हटले. दुसरीकडे भिडे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. ती आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आली आणि आता या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याचा पुनरुच्चार सरकारी वकिलांनी केला.