Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नराधम वॉचमनला जन्मठेपेची शिक्षा

पनवेल ः वार्ताहर
आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला, तर दुसर्‍यास सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पनवेल शहरातील पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत पनवेलच्या टिळक रोड येथील सदाशिव बिल्डींगसमोरून जात असताना या बिल्डींगचे वॉचमन शिवमढी पांडे आणि श्रीकांत पांडे यांनी पीडितेच्या आईला गेटच्या आत बोलावून घेतले आणि बिल्डींगमधील एका मॅडमकडे घरकाम आहे, असे सांगून नोंदवही दाखविण्याचा बहाणा करून फिर्यादीस बोलण्यात गुंतवून ठेवत दिशाभूल केली. त्याचवेळी फिर्यादीसोबत असणारी तिच्या अल्पवयीन मुलीला वॉचमन रूममध्ये नेऊन तिच्यावर या दोन नराधामांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले आणि याबाबत तिने कोणास सांगू नये याकरिता तिला मारहाण करून दमदाटी केली. पीडितेने हा प्रकार आईला सांगितला. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात वॉचमन शिवमढी पांडे व श्रीकांत पांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोन्ही आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सहजिल्हा व अतिरिक्त सहसत्र न्यायाधीश (पनवेल) शाइदा शेख यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात पीडित मुलगी, तिची आई, पंच आणि तपासिक अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. प्रतिक्षा वडे-वारंगे यांनी अभियोग पक्षातर्फे काम पाहिले. सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी विद्या भगत, वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी सहकार्य केले.
दोन आरोपींपैकी वॉचमन श्रीकांत पांडे याचा तुरूंगातच मृत्यू झाला होता. दुसरा आरोपी वॉचमन शिवमढी पांडे (वय 25) यास भा.दं.वि. कलम 376 ड, 323, 506 तसेच पोक्सो कलम कायदा 3,4,5 (जी), 6 अन्वये जन्मठेपेची व 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दंडाच्या रकमेपैकी 25 हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply