Breaking News

…उलट्या बोंबा

भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कुचराई झाल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. सध्या सणासुदीचा विराम घेतलेली ही यात्रा पंजाब आणि जम्मू-काश्मीर या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशा राज्यांमधून यापुढे जाणार आहे. त्याआधीच हेतुपुरस्सर हा कांगावा करण्यात आला, परंतु केंद्रीय राखीव सुरक्षा दलाने काँग्रेसच्या या तक्रारीला सडेतोड उत्तर दिले असून 2020पासून स्वत: राहुल गांधी यांनीच सुरक्षेबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तब्बल 113 वेळा उल्लंघन केल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची मनांना जोडण्याचे कथित काम करणारी यात्रा सध्या सुटीवर आहे. नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षाच्या सुटीच्या मौसमात बरोबर राजधानी नवी दिल्लीमध्ये पोहचलेल्या राहुल गांधी यांनी आपल्या यात्रेला तूर्तास विराम दिला आहे. नऊ दिवसांच्या विरामानंतर ही यात्रा पंजाबमार्गे काश्मीरकडे प्रयाण करील, मात्र या संवेदनशील राज्यांमधील प्रयाणापूर्वी वातावरणनिर्मिती करण्याची खबरदारी यात्रेच्या प्रसिद्धीविभागाने घेतलेली दिसते. काँग्रेस पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्या सुरक्षेतील त्रुटींची तक्रार केली. वास्तविक 7 सप्टेंबर रोजी दक्षिण भारतातील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरूवात झाली. राजधानी दिल्ली गाठेपर्यंत या यात्रेने 2800 किलोमीटरचे अंतर कापले आहे. या संपूर्ण काळात कुठेही राहुल गांधी यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झालेला नाही. असे असताना अचानकपणे काँग्रेस पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होणार्‍या सर्व भारत यात्री आणि नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे. राजधानीपर्यंतच्या संपूर्ण यात्रेत राहुल गांधी पहा कसे जनतेत मिसळतात याचा दिखावा करत स्वत:चीच पाठ थोपटून घेणार्‍या काँग्रेस पक्षाला आता इथून पुढच्या यात्रेमध्ये त्यांच्या सुरक्षेची चिंता का बरे वाटू लागली असावी? पंजाब आणि जम्मू-काश्मीर ही दोन्ही राज्ये सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहेतच. तेव्हा त्यादृष्टीने अतिरिक्त सुरक्षेची मागणी करणे समजून घेता येऊ शकते, पण तसे करताना राहुल यांच्या सुरक्षेत राजधानी दिल्लीमध्ये कुचराई करण्यात आली असा कांगावा करून सुरक्षा यंत्रणांवर हेत्वारोप कशासाठी बरे करण्यात यावा? राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने हेतुपुरस्सर ही तक्रार करण्यात आल्याचे कुणाला वाटल्यास त्यात वावगे ते काय? वास्तवत: सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून दिल्ली पोलिसांनीही या यात्रेसाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते, परंतु नेहमीप्रमाणे अनेक प्रसंगी स्वत: राहुल गांधी यांनीच सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असे आता सीआरपीएफने काँग्रेसच्या तक्रारीला उत्तर देताना म्हटले आहे. राहुल गांधी अनेकदा सुरक्षेचा घेरा तोडून लोकांना भेटून आपली सुरक्षा धोक्यात घालतात यावर सीआरपीएफने बोट ठेवले. सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित संरक्षित व्यक्तीचीही असतेच असते, मात्र याची जाणीव राहुल गांधी यांना दिसत नाही. असे असताना त्यांच्या आणि अन्य यात्रींच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्ष अत्यंत सोयीस्करपणे केंद्र सरकारवर टाकू पाहात आहे एवढाच या कांगावाखोर तक्रारीचा अर्थ दिसतो.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply