रसायनी ः प्रतिनिधी
लहरी हवामानावर मात करण्यासाठी शेतकर्यांकडून वेगवेगळी पिके, उत्पादने घेण्याची गरज आहे, तरच त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. याचाच एक भाग म्हणून पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे शेती संशोधक व प्रगतशिल शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी 50 स्टॉबेरीची झाडे प्रयोग म्हणून लावली होती. त्यात त्यांना यश आले असून साधारण दीड महिन्यात फळ परिपक्व झाले आहे. शेतीत सातत्याने संशोधन करणारे मिनेश गाडगीळ यांनी व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केवळ प्रयोग म्हणून आपल्या हवामानात, मातीत हे उत्पादन होइल का हे पाहण्यासाठी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. योग्य प्रकारे खतमात्रा, फवारण्या व ड्रीप इरिगेशन, मल्चिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतल्यास उत्तम उत्पादन येऊन शेतकर्यांना फायदेशीर असे उत्पादन घेता येइल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्ट्रॉबेरीबरोबरच रब्बी हंगामात हरभरा, वाल, मुग, मटकीखेरिज राजमाचे पीक गाडगीळ यांनी घेतले. नोव्हेंबर महिन्यात वालाप्रमाणेच राजमाची लागवड केली असता एक महिन्यात त्यास शेंगा लागल्या. राजमाला दरही चांगला मिळतो. त्यामुळे शेतकर्यांनी हेही पीक घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या वर्षीच खरीप हंगामात गाडगीळ यांनी लाल तांदुळ व आरएनआर तेलंगणा सोना हे तांदळाचे वेगळे वाण पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले होते. एक गुंठ्याला साधारण 82 किलो भात घेऊन परिसरातील सर्वांत जास्त उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या तांदळाची ग्लॅयसेमिक इन्डेक्स कमी असल्याने डायबेटिस पेशंट या तांदळाचा भात खाऊ शकतात व या तांदळाला बाजारात भावही जास्त मिळतो. मिनेश गाडगीळ यांना राज्य शासनाचा कृषिभूषण हा सन्मान प्राप्त झालेला असून शेतकर्यांनी सतत प्रयोगशील राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.