Breaking News

‘रयत’ने नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे -खासदार शरद पवार

विशेष अभीष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

सातारा : प्रतिनिधी
कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. आपली ही संस्था देशातील महत्त्वाची संस्था असून ती नव्या वळणावर आहे. या पुढच्या काळात संस्थेने भविष्याचा वेध घेऊन नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बुधवारी (दि. 4) येथे केले.
रयत शिक्षण संस्थेत खासदार शरद पवार यांचा सुवर्णमहोत्सवी सक्रिय कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या 82व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेने विशेष अभीष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, तर संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार दिलीप वळसे-पाटील व सिम्बॉयसिसचे शं. बा. मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
या समारंभात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते खासदार शरद पवार यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या पन्नास वर्षांमध्ये ‘रयत’च्या व्यासपीठावरून खासदार शरद पवार यांनी विचार व्यक्त केलेल्या भाषणांचे संकलन केलेल्या ‘रयतच्या विचारमंचावरून’ या ग्रंथाचे तसेच विविध कार्यक्रमांमधील छायाचित्रांचे संकलन करून सुवर्णबिंदू या कॉफी टेबल बुकचे व शरदोत्सव या दृकश्राव्य डॉक्युमेंटरीचे प्रकाशन करण्यात आले तसेच रयतवाणी कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.
संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी, मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळुंखे यांनी मानले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून संस्थेस पाच कोटींची देणगी
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेस पाच कोटी रुपयांची देणगी दिली. या रकमेचा धनादेश त्यांनी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply