Breaking News

पर्यावरण, पर्यटनक्षेत्र आंबेनळी घाटाची डागडुजी

रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट 4 जानेवारी 2023 रोजी दुरूस्ती कामासाठी बंद राहिल्याने या अनुषंगाने या घाटाच्या इतिहासाची पाने चाळविण्याची गरज भासू लागली. पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान शिवकालीन डुक्करसोंडीचा घाट, त्यानंतरचा रडतोंडीचा घाट, ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाट आणि सद्यस्थितीत सर्वपरिचित आंबेनळी घाट असे नामांतर झालेल्या या रस्त्यावर 23 जुलै 2021 रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे ठिकठिकाणी डोंगरउतारावरून मोठमोठ दगड आणि मातीचा गाळ पावसाच्या पाण्याच्या लोटासोबत कोसळून मोर्‍यांचे तसेच रस्त्याचे अपरिमित नुकसान झाले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रथम रायगड विभागाकडून एकेरी वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला आणि घाटरस्ता दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वरकडून सुरू राहिले. सद्यस्थिती पार फाट्यापासून महाबळेश्वरलगतच्या मेटतळे गावापर्यंतच्या घाटरस्त्यातील मोर्‍यांच्या कामात रस्ता फोडून काँक्रीटचे पाईप जमिनीमध्ये गाडण्याचे काम बुधवारी आठ तासात युध्दपातळीवर करण्यात येणार असून यामुळे पोलादपूर ते प्रतापगडपर्यंत वाहतूक सुरू राहणार असली तर पार फाट्यापासून महाबळेश्वरपर्यंत वाहतूक सुरू राहणार नसल्याने संपूर्ण आंबेनळी घाटातील वाहतूक बंद करून आंबेनळी घाटाची डागडुजी करण्याचा निर्णय महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना घ्यावा लागला. याआधी झालेले आंबेनळी घाटाचे दुरूस्ती काम रायगड विभागातील ठेकेदारांनी नैसर्गिक आपत्ती निवारणातून केल्यानंतर आता या घाटाची दुरूस्ती ही एकाच दिवसातील आठ तासांमध्ये घाटरस्ता फोडून रस्त्यामध्ये मोरीचे काँक्रीट पाईप टाकण्यासाठी केली जात आहे. यामुळे या आधी अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे मेगाब्लॉक झालेल्या या घाटामध्ये आता दुरूस्ती कारणामुळे मानवनिर्मित मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे. पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. या मार्गाला आजही शिवाजी रस्ता म्हटले जाते. त्याकाळी महाड ही तरत्या बंदराची उतारपेठ होती. महाड तालुक्याला पोलादपूर पेट्याचा मुलूख 1948 सालापर्यंत जोडला होता. ब्रिटीशांनी पोलादपूरला महाल कचेरी ठेवली होती. स्वातंत्र्यानंतर 1958 साली पोलादपूर हा स्वतंत्र तालुका अस्तित्वात आला. पण तत्पूर्वी 1826 पर्यंत पार घाट हाच शिवकालीन मार्ग सातारा, वाई, कराडपर्यंत वाहतूकीसाठी वापरात येत होता. महाडच्या तरत्या बंदराच्या उतारपेठेतून मीठ, सुकी मासळी, नारळ, विडयाची पाने आदी सामानाची वाहतूक पार घाटामार्गेच वर्षानुवर्षे होत असे, मात्र आजचे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर शिवकाळात दंडकारण्यातील श्रीक्षेत्र महाबळेश्वर असे परिचित होते. पार घाटातून 1826 पूर्वी महाबळेश्वरला जाणारी पायवाट होती. येथून बंजारा लोक मीठ आणि धान्याची वाहतूक करीत. पारघाटातून येणार्‍या व जाणार्‍या मालावर घाटाच्या देखभालीसाठी जकात आकारली जात असे. आझ्याच्या बैलासाठी 1 रूका, धान्य,भूसा व मिठाच्या गोणीसाठी 3 रूके, तंबाखू व उडीद 6 रूके, कापड बंगी पाव रूका आणि कांबळे (ब्लँकेट) ओझे 9 रूके असे जकातीचे स्वरूप शिवकाळात होते. पारघाटाला रडतोंडीचा घाट हा पर्यायी मार्ग होता. याखेरिज, भोर संस्थानापासून कामथे आणि ढवळे घाट वाटसरूंसाठी वापरात होते. मात्र, हा घाट दूर्गम व अवघड असल्याने येथून मालवाहतूक कठीण होती. सातारा, वाईशी कमी अंतरात पोहोचण्याचा हा मार्ग बिकट तर होताच पण या मार्गाची डागडुजी, देखभाल दुरूस्ती करण्यासाठी खुपच खर्च झाला. तरीही ब्रिटीशांना घोडागाडी अथवा मोटारगाडीसाठी उपयुक्त मार्ग तयार करण्याची आवश्यकता भासू लागल्याने पार घाटाच्या उत्तरेस 0.81 कि.मी. अंतरावर कापडे खुर्द गावाजवळ नव्याने घट बांधला. या घाटाला फिटझगेराल्ड म्हणत. हाच सध्याचा आंबेनळी घाट होय. या घाटाच्या उभारणीस 1871 साली सुरूवात होऊन केवळ 4 लक्ष 44 हजार रूपये खर्च झाला. हा घाट पाचच वर्षात वाहतुकीस खुला होऊन 1876 सालापासून ब्रिटीश आणि व्यापारी घोड्याला लगाम न लावता कापडे खुर्दपर्यंत उतरत असत. या घाट उभारणीच्या काळातच श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटीशांनी विकास केला. शिवकाळात रायगडावरून निघाल्यावर समर्थ रामदासस्वामींचे दर्शन शिवथरघळीत घेतल्यानंतर पिंपळवाडीपासून महादेवाचा मुरा व तेथून सह्याद्रीच्या रांगांमधून थेट कांगोरीगडावर जात. शिवरायांनी हा गड हिंदवी स्वराज्यात आल्यावर त्याचे नांव मंगळगड ठेवले. तेथून पुढे ढवळागड म्हणजेच चंद्रगडावर विश्रांती आणि पारच्या देवीचे दर्शन. त्यावेळी पारला पार्वतीपूरही म्हणत असत आणि तिथे तुळजापूरची भवानीमाता हीदेखील रामवरदायिनीदेवी समवेत वास्तव्यास असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर या भवानीमातादेवीला खानाचा रूधिर टीळा लावल्याचा उल्लेख आहे. पुढे शिवरायांनी प्रतापगडावर म्हणजेच अफजलखानाच्या वधापूर्वीचा गुर्‍हागड येथे तुळजाभवानीची स्थापना केल्यानंतर देवळे येथील चित्रे कुटूंबाची रामवरदायिनी देवी कापडे बुद्रुक येथे पूजली जाऊ लागली. महिपतगड, कोंढवीगड, तानाजी मालुसरेंचे जन्मस्थान उमरठ गांव, सूर्याजी मालुसरेंची समाधी साखर ही शिवकालीन सृष्टी केवळ ब्रिटीशांनी फिटझगेराल्ड म्हणजे आंबेनळी घाट उभारल्यानंतर दृष्टीआड गेली आहे. त्यामुळे पोलादपूर ते महाबळेश्वरपर्यंत ऐतिहासिक व पर्यावरण पर्यटन क्षेत्र (इको टूअरीझम) घोषित करून या मार्गाचा सुनियोजित विकास केल्यास या भागाचे महत्व वाढेल. मात्र, या परिसरातच इको सेन्सेटीव्ह झोन निश्चित करण्यात येऊन कापडे बुद्रुक येथील रामवरदायिनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आंबे, फणस, काजू, जांभळं, तोरणं, आळू, आसाणे असा फळे व रानमेव्याचा स्वाद घेत डोंगर झाडीतून वनभ्रमंती करण्यासाठी कुंभळवणे, पायटेवाडीपासून सुरूवात केल्यास घोडवती नदीच्या चिंचोळया उथळ पात्रातून पर्यटकांना आगळावेगळा आनंद मिळतो. तेथून पुढे दाभिळटोक भागात दर्‍यांत डोकाविताना आपण पक्षी होऊन विहंगम संचार करीत असल्याचा भास होतो. येथून काश्मीरी पहेलगामसारखे वाटीसदृश्य भागात वसलेले आदर्शगाव ढवळे इवलेसे दिसते. आंबेनळी घाटात निसर्गसहवासाने तृप्त होताना तृषार्तही झाल्याची जाणीव होते. सध्या महाबळेश्वर गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण पाहण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांची तसेच सातारा, वाई, कराड, कोल्हापूरपर्यंत जाणार्‍या प्रवाशांची वाहतूक आंबेनळी घाटात मोठया प्रमाणात  होते. हा संपूर्ण घाटरस्ता दूर्गम आणि त्याभोवतीच्या दर्‍या खूपच खोल असूनही या घाटात डोंगराच्या बाजूने रस्त्यावर कोसळणारे मातीचे दरडीचे ढिगारे दोन तीन वषे हलविले गेल्याने घाटरस्ता कसाबसा दुपदरी म्हणावा इतका अरूंद झाला आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला संरक्षक कठडे नसल्याने वाहने कोसळून अनेकांचे जीवन संपुष्टात आले आहे. परिणामी, महाबळेश्वरला मुंबईचे पर्यटक आता मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरून व त्यानंतर पुणे ते वाईमार्गे पसरणी घाटातून जाऊ लागले, मात्र तो पसरणी घाट यापेक्षाही अधिक असुरक्षित असल्याचे गुजरात राज्यातील एक आरामगाडी उलटून अनेक कुटूंबे दगावल्याने स्पष्ट झाले. पोलादपूर ते महाबळेश्वर या मार्गावरही दरवर्षी अलिशान गाडयांचे अपघात झाले आहेत. त्यात प्रत्येकवेळी किमान पाच ते सात प्रवासी ठार झाले आहेत. अलिकडेच, येथे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात होऊन तब्बल 30 जण दगावले असल्याने भविष्यात तसा धोका निर्माण होणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट हा नजिकच्या काळात ऐतिहासिक व पर्यावरण पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू होतील, अशी मागणी आहे.

-शैलेश पालकर

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply