महाड ः प्रतिनिधी
दासगावमधील श्री रंगावली संस्थेतर्फे आपली परंपरा जपण्याच्या हेतूने होडी स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 8) केले होते. ‘वल्हव रे नाखवा वल्हव…वल्हव’ म्हणत होडीतील नाखव्याने भरतीचे पाणी आणि सोसाट्याचा वारा सहन करीत स्पर्धेतील आपले लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी होडी चालवण्यात या प्रथम क्रमांक – जयेश मिंडे, परेश निवाते, आदिनाथ मिंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गेली अनेक वर्ष या परिसरातील भोई समाज आपला उदरनिर्वाह होडीतून मासेमारी आणि वाळू काढून करीत आहेत. यामुळे आपली परंपरा जपली जावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते. रविवारी सकाळी होडी चालवण्याच्या या स्पर्धेला प्रारंभ झाला. गावातील तरुण आणि महिला वर्गाने वैविध्यपूर्ण वेशभूषा करीत या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यामुळे दासगाव बंदर परिसरात एकच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई आणि अन्य शहरात असलेल्या भोई समाजाच्या लोकांनीदेखील स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. आठ होड्यांचा एक गट याप्रमाणे रेल्वेपुलाजवळून होड्यांना सूचना देताच स्पर्धेला सुरुवात झाली. प्रत्येक होडीत तीन स्पर्धक बसवण्यात आले होते. स्पर्धेत प्रथम जयेश मिंडे, परेश निवाते, आदिनाथ मिंडे, द्वितीय दिपेश निवाते, रुपेश पड्याळ, निखिल निवाते, तृतीय सुमेश जाधव, प्रणेश निवाते, स्वप्नील जाधव, चतुर्थ प्रियेश निवाते, सतिश निवाते, धर्मेंद्र पड्याळ यांनी पटकावले. आकर्षक होडी सजावट प्रथम संतोष पड्याळ यांच्या गुरुकृपा होडीला, द्वितीय बाळकृष्ण मिंडे यांच्या दर्यादौलत होडीला, तर तृतीय क्रमांक गणेश मिंडे यांच्या लक्ष्मी होडीला देण्यात आला. स्पर्धेदरम्यान आकर्षक पेहराव करणार्या रोहित मिंडे (वासुदेव) प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, कौस्तुभ मिंडे (छत्रपती शिवाजी महाराज) आणि तृतीय क्रमांक सानवी मिंडे (मच्छीवाली), उत्कृष्ट नाखवा प्रथम जयेश मिंडे, द्वितीय रुपेश पड्याळ, तृतीय क्रमांक सुमेश जाधव यांनी पटकवला.