नवी मुंबई : बातमीदार
बहुचर्चित एनएमपीएल अर्थात नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद आग्रोळी येथील जय मल्हार फायटर संघाने पटकाविले, तर गोठवली येथील साईप्रसाद संघाने उपविजेतेपदाला गवसणी घातली.
एनएमपीएल टेनिस बॉल क्रिकेट लीग कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर रंगली. या स्पर्धेत नवी मुंबईतील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या वेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक, स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आणि माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स तसेच संकल्प नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, एनएमपीएल आयोजन समितीचे स्वप्निल नाईक, आयपीएल कमिशनर दीपक पाटील, कुणाल दाते, ओंकार नाईक, प्रतीक पाटील, निलेश पाटील, तुषार पाटील यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतिम सामना पाच षटकांचा झाला. यात आग्रोळीच्या जय मल्हार संघाने 50 धावांचे आव्हान गोठवली येथील साईप्रसाद संघासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गोठवली संघ 40 धावांपर्यंत मजल मारू शकला. विजेत्यांना आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेळाडूंनाही बक्षिसे देण्यात आली. यामध्ये मालिकावीर प्रथमेश, उत्कृष्ट फलंदाज नमित पाटील, उत्कृष्ट गोलंदाज नितीन सुतार अग्रोळी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वराज म्हात्रे, पदार्पणातील उत्कृष्ट खेळाडू सुशील, उदयांकित खेळाडू शिबू मथाई यांचा समावेश होता.
से नो टू ड्रग्सचा संदेश
स्पर्धेत 240 खेळाडूंचा चुरशीचा खेळ पहावयास मिळाला. या स्पर्धेचा मागील पाच दिवसांत टेनिस बॉल क्रिकेट डॉट कॉम संकेतस्थळावर 10 लाखांपेक्षा अधिक क्रिकेटरसिकांनी आनंद घेतला. 184 देशांमध्ये स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. विशेष म्हणजे से नो टू ड्रग्स असा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देताना युवकांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवत मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन करण्यात आले.
नवी मुंबईमध्ये क्रिकेटसाठी जे प्रेम आहे ते इतर सर्व शहरांपेक्षा अधिक आहे. मी स्वतः बांद्रा येथे राहते, परंतु माझे हृदय नवी मुंबईतच असते, कारण क्रिकेटच्या बाबतीत सहकार्य करण्यासाठी येथील लोक तत्पर असतात. क्रिकेट खेळायला पुढे नेण्यात फक्त क्रिकेटपटूंचा सहभाग असतो असे नाही, तर यात क्रिकेटवर प्रेम करणार्या सर्वांचे श्रेय असते.
-जेमिमा रॉड्रिग्ज, महिला क्रिकेटपटू