कर्जत : बातमीदार
तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याबाबत कर्जत तालुका भाजप आक्रमक झाला आहे. शहरातील लो. टिळक चौकात तालुक्यातील खराब रस्त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडून कर्जत भाजपने बुधवारी (दि. 6) आंदोलन केले. या आंदोलनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषद बांधकाम खाते यांना भापने जाब विचारला.
कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-भडवळ, नेरळ-कळंब, नेरळ-कशेळे, कळंब-पाषाणे, कर्जत-कोंडीवडे, नेरळ पेशवाई रोड आणि चिंचवली-कडाव या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील रस्त्यांची स्थिती दाखविणारे छायाचित्र प्रदर्शन कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात लावण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, भाजप किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे, कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप नेरळ जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष संदीप म्हसकर आदी या वेळी उपस्थित होते.
खड्डेमय रस्त्यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी कर्जत तालुक्यातील खराब रस्त्यांना हे राज्य सरकार अवलंबून असून सर्व रस्ते खड्डेमय झाल्याने रस्त्यावरून प्रवास करणार्यांच्या शरीराचा खुळखुळा झाला आहे. पाठीच्या आजारांनी वाहनचालक त्रस्त झाले असून, शासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे, असे जाहीर केले.
शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देऊन या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून अनेक ठिकाणी आंदोलने करू असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी या वेेळी दिला.