पिकाने भरलेल्या शेतातील भातपीक कापले; ग्रामस्थांचा विरोध
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील तेलंगवाडीमधील आदिवासी शेतकर्यांनी वहिवाट असलेल्या जमिनीत भातपीक लावले होते. या पिकाने भरलेल्या शेतात वन विभागाने शनिवारी (दि. 5) कापणी मशीन लावले, मात्र शेतकर्यांनी त्याला विरोध केल्याने वन विभागाने ती कारवाई अर्धवट सोडली आहे. कर्जत तालुक्याचे पहिले आमदार राहिलेले मनोहर कुशाबा पादिर यांचे भाऊ मालू कुशाबा पादिर यांची तेलंगवाडीच्या पायथ्याशी जमीन होती. त्या जमिनीवर फार पूर्वीपासून तेलंगवाडीमधील ग्रामस्थ शेती करीत आहेत. काही वर्षांपूर्वी त्या जमिनीला वन विभागाच्या अखत्यारित आणले गेले आणि 35 सेक्शन लावले गेले व शेतकर्यांना विश्वासात न घेता या जमिनीला काटेरी तारेचे कुंपणही घातले, मात्र तेथील शेतकर्यांनी वहिवाट असलेल्या जमिनीत भाजीपाला तसेच भाताची शेती केली. शनिवारी (दि. 5) वन विभागाचे कर्जत पूर्व भागातील अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन कारवाईसाठी पोहचले. त्यांनी भातपीक कापण्यासाठी कापणी मशीन सोबत आणली होती. त्याच्या सहाय्याने भाताची रोपे कापण्यात येत असल्याचे आणि भाजीपाला उपटून फेकून देत असल्याची माहिती मिळताच तेलंगवाडीमधील शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विरोध केल्याने वन विभागाला ही कारवाई थांबवावी लागली. दरम्यान, वनक्षेत्रपाल निलेश भुजबळ, वनपाल जे. एन. सुपे यांनी केलेल्या या कारवाईत लक्ष्मण पदू पादिर, जानू मोतीराम पादिर, मंगळ गणू केवारी, हरेश जानू पादिर या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. आदिवासी समाज संघटनेने रविवारी (दि. 6) तेलंगवाडीमध्ये जाऊन पाहणी केली आणि वहिवाट असलेली जमीन आपलीच आहे, असेे वन विभागाला कळविले आहे. या शेतांमधील भाताचे पीक कापण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास त्याला विरोध करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
तेलंगवाडी येथील जमिनीला वन विभागाचे 35 सेक्शन लागले असून, आम्ही त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची शेती करू नये, असे स्थानिकांना सांगितले होते, मात्र त्यांनी अतिक्रमण केल्याने आम्ही ते काढण्यासाठी गेलो आणि कारवाई करून परत आलो. पुढील कारवाई आणखी कठोरपणे केली जाईल, असे आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे.
-निलेश भुजबळ, वनक्षेत्रपाल, वन विभाग, कर्जत
आमचे आदिवासी बांधव वर्षानुवर्षे त्या ठिकाणी शेती करीत आहेत. त्यामुळे अशी कारवाई वन विभाग करू शकत नाही. आमच्या जमिनी वाचविण्यासाठी आमचा पूर्ण समाज रस्त्यावर उतरेल.
-भरत शिद, अध्यक्ष, आदिवासी ठाकूर कातकरी समाज
आम्ही वन विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी बोलावले म्हणून पोलीस बंदोबस्त दिला होता. त्याशिवाय त्या कारवाईत आमचा कोणताही हस्तक्षेप नाही.
-सचिन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक