रसायनी : प्रतिनिधी
जी कॅम्प अबॅकस या संस्थेच्या वतीने उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोन दिवस विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मोफत मार्गदर्शंन करण्यात आले. जी कॅम्प अबॅकस संस्थेचे संचालक श्रीकांत देवकर व तृप्ती पाटील याच्या माध्यमातून हे उन्हाळी शिबिर उत्साहात झाले. या उन्हाळी बालसंस्कार शिबिरात बाल कलाकार व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या वेळी पालकवर्गही उपस्थित होता.
या उन्हाळी बालसंस्कार शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मातीकाम, हस्ताक्षर सराव, मजेशीर खेळ, नृत्य अदाकारी, कलाकुसर, अबॅकस, चित्रकला व रंगकाम या कलेचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले. सदर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना नाश्त्याची व्यवस्था संस्थेकडून करण्यात आली होती. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, नवी मुंबईचे विद्यमान संचालक प. पू. योगेश्वरदास स्वामी, श्री स्वामीनारायण सेवा संस्थान अमेरिकाचे विद्यमान संचालक प. पू. श्रृतीस्वरूपादास स्वामी, तसेच मानव अधिकार संघटना कर्जत संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल पवार (माऊली) आदी उपस्थित होते. सदर उन्हाळी बालसंस्कार शिबिरात एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अशा शिबिराचे अयोजन हे संस्थेने दरवर्षी कर्जत शहरात करावे, अशी मागणी पालकवर्गाने संस्थेकडे केली.