मुंबई : प्रतिनिधी
माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का? हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचे आत्मचिंतन करा, असा सल्लाही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.
रामदास कदम म्हणाले की, मी गेल्या 52 वर्षांपासून शिवसेनेसाठी संघर्ष करीत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक यासाठी साक्षीदार आहेत. 52 वर्षे काम करणार्या एका शिवसैनिकावर राजीनामा देण्याची वेळ का येते याचे आत्मपरीक्षण करा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढले आणि आधी राजीनामा फेकला. आपल्या मनातील खदखद मांडताना कदम यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 51 आमदारांनी शिवसेना वाचवली असल्याने मी त्यांचे आभार मानतो. शिंदे आणि आमदारांनी निर्णय घेतला नसता, तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 10 आमदारही निवडून आले नसते, असा दावा रामदास कदम यांनी केला.
कदम पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती, कोरोना होता हे मान्य, पण अडीच वर्षात हे घडले म्हणून नशीब, अन्यथा पाच वर्षांत संपूर्ण शिवसेना संपली असती.
ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करून हिंदुत्व उभे केले, ते आज जिवंत असते तर यांच्यासोबत युती करीत हे पाप करू दिले असते का, अशी विचारणा कदम यांनी केली.
हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात एकत्र कसा येता येईल यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले पाहिजे. गुवाहाटीत जाऊन मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करीत तयार केले होते, पण येथे आजुबाजूला असलेले नेते बैल, कुत्रे, रेडे आणि महिला आमदारांना वेश्या म्हणू लागले. हा काय बिहार आहे का, असा संतप्त प्रश्न कदम यांनी विचारला. आदित्य ठाकरेंचे वय काय आणि आमदारांना काय बोलतायत याचे भान ठेवा, असेही त्यांनी सुनावले.
उद्धव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावे. शिवसेना पूर्ण संपण्याची वाट पाहू नका, असा सल्लाही कदम यांनी दिला आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …