Breaking News

लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत, चिंचवड थांबा; रेल्वे राज्यमंत्र्यांच्या अधिकार्‍यांना सूचना, पासची सुविधाही होणार सुरू

कर्जत : प्रतिनिधी

चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणेदरम्यान प्रवास करणार्‍यांना महिना, तीन महिन्याचा पास देण्याची सुविधा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. कोरोना काळापासून चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या थांबत नाहीत. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर पूर्वीप्रमाणे रेल्वे गाड्या धावू लागल्या आहेत. आरक्षित तिकीटांबरोबर ऐनवेळी तिकीट काढणार्‍यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र चेन्नई, कोणार्क, कन्याकुमारी, महालक्ष्मी, सिंहगड, अहिंसा, कोल्हापूर, सह्याद्री, डेक्कन एक्सप्रेस अशा 18 रेल्वे गाड्यांचा कर्जत, चिंचवड स्थानकावरील थांबा अजूनही बंद आहे. 1 डिसेंबरपासून सुरु झालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसचाही कर्जत येथील थांबा बंद आहे. पूर्वी डेक्कन एक्स्प्रेस चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर थांबत होती. आता त्याचा थांबा लोणावळा केला आहे. त्यामुळे कर्जत स्थानकावरील प्रवाशांना रेल्वे पकडण्यासाठी कल्याण, बदलापूर स्थानकावर जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.  चिंचवड, कर्जत स्थानकावर जास्तीत जास्त गाड्यांना थांबा देण्याची प्रवाशांची मागणी आहे. खासदार बारणे यांनी या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. कर्जत आणि चिंचवड या रेल्वे स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची आवश्यकता असून या दोन स्थानकांवर काही गाड्या थांबविण्याची तसेच पासची सुविधा पुन्हा सुरु करण्याची विनंती बारणे यांनी या वेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे केली. या वेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी संबंधित अधिकार्‍यांना बोलावून घेतले व लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना चिंचवड, कर्जत स्थानकांवर थांबा देण्याचे आदेश दिले तसेच पासची सुविधाही पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply