आमदार प्रशांत ठाकूर यांचा व्यवस्थापनाला इशारा
तळोजा ः रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेस केमिकल कंपनीने 118 कामगारांना कामावरून काढले आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 2) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांनी येत्या आठवड्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाला तुम्हाला कामावर घ्यायला तरी लावणार किंवा कंपनी बंद पाडणार, असा इशारा दिला. यापूर्वी कंपनीतील 40 कामगारांना कामावरून काढण्यात आले होते. त्या वेळी भाजपच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला पत्र देऊन कामगरांना कामावर घ्या; अन्यथा 6 फेबु्रवारीला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र व्यवस्थापनाने मुजोरपणा दाखवत आणखी कामगारांना कामावरून काढले. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी गेट बंद आदोलन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, ज्या कंपनीला स्थानिक कामगार नको ती कंपनीच आम्हाला नको. जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन कामगारांना न्याय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल, तसेच येत्या सोमवारपर्यंत कंपनी प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर सोमवारनंतर एकही कामगार गेटच्या आत जाऊ देणार नाही. या गेटबंद आंदोलनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, माजी सरपंच कृष्णा पाटील, दिलीप भोईर, चिंध्रणचे माजी सरपंच एकनाथ पाटील, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र नाईक, निलेश पाटील, युवा नेते अॅड. पवन भोईर, पाले बुद्रुकचे माजी सरपंच दिलीप वास्कर, आकाश फडके, राजू कडू, महिला कामगार आघाडीच्या समिरा चव्हाण, विनायक मुंबईकर, अजय मोरावकर, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.