Breaking News

उंबरखिंड विजय दिन उत्साहात

खोपोली ः प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने उंबरखिंडची लढाई सरनौबत नेताजी पालकर यांनी 2 फेब्रुवारी 1661 रोजी जिंकली. त्याचा 362वा विजय दिन गुरुवारी ग्रुप ग्रामपंचायत चौक व तुपगाव तसेच नेताजी पालकर ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला. उत्तर कोकण जिंकण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्याविरोधात लढण्यासाठी पाठविले. शिवरायांना याची खबर त्यांच्या गुप्तचर यंत्रणांनी अगोदरच दिल्याने महाराज हे नेताजी पालकर यांच्याबरोबर सैनिकांसह या भागात दाखल झाले होते. शाहिस्ते खानाचा विश्वासू सरदार कारतलब खान मोगल सैन्यासह घाट उतरून दुर्गम उंबरखिंडीत येत असताना 2 फेब्रुवारी 1661 रोजी दोन्ही बाजूस कड्याकपार्‍या, घनदाट अरण्य, रखरखते उन यामुळे त्याची दमछाक झाली. त्याचवेळी खिंडीत दबा धरून बसलेल्या नेताजी पालकर यांच्या सैन्याने मोगल सैन्याची दाणादाण उडविली. त्यामुळे कारतलब खान व इतर महाराजांना शरण आले. ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवरायांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे चौक हे जन्मगाव. दरवर्षीप्रमाणे यंदाही उंबरखिंड विजय दिनानिमित्त नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार देवेंद्र साटम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, माजी जि. प. सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी, चौक सरपंच रितु ठोंबरे, तुपगाव सरपंच रवी कुंभार, अध्यक्ष संजय कोंडीलकर यांनी केले. यानंतर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभा देशमुख, प्राची दबके, नैना झिंगे, रिना सोनटक्के, पूजा हातमोडे, ऋषाली आंबवणे यांनी मशाल प्रज्वलित केली. ही मशाल रॅली संपूर्ण चौक बाजारपेठेतून फिरवून चौक व तुपगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात असलेल्या नेताजी पालकर यांच्या अर्धपुतळ्याजवळ दोन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी एस. पी. जाधव, सचिन कुराडे, मंडल अधिकारी किरण पाटील यांनी स्वागत केले. मग नेताजी पालकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी लेझिम, शौर्यगीत, पोवाडे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य व धर्मरक्षक संभाजीराजे यांचे ऐतिहासिक प्रसंग साकारले. या वेळी उपसरपंच राजेश गावडे, निखिल मालुसरे, अजिंक्य चौधरी, तुपगाव उपसरपंच सुयोग भालेकर, सचिन साखरे, निलेश मोरे, कांता नागावकर, स्वाती जाधव, अश्विनी मोरे, रोहिणी गुरव, सपना गुरव, सुरेश घाग, मिलिंद सुरावकर, जग्गु हातमोडे यांच्यासह इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply