खोपोली : प्रतिनिधी
प्रशासनाने बंदी घातली असतानाही मंगळवारी पंधरा पर्यटक झेनिथ धबधबा परिसरात गेले, त्या वेळी अचानक कोसळल्या पावसाने पाण्याचा प्रवाह वाढला व दुर्घटना घडून त्यात तीन जणांचा बळी गेला. त्यामुळे बंदी आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झेनिथ धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून 15 ऑक्टोबरपर्यंत या धबधबा परिसरात जाण्यास कडक बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तत्कालीन प्रांताधिकारी शीतल परदेशी यांनी हे आदेश पारित केले आहेत. या ठिकाणी पर्यटक किंवा कोणी व्यक्ती जाऊ नयेत म्हणून खोपोली पोलीस व नगरपालिकेकडून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज होती, मात्र बंदी आदेशाचे उल्लंघन करून मंगळवारी 15 पर्यटक झेनिथ धबधबा परिसरात गेले त्यातील तीन जणांचा बळी गेला. सदर घटना घडल्यानंतर बुधवारी झेनिथ धबधबा प्रवेशद्वारावर नगरपालिका कर्मचारी व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या भयंकर घटनेनंतर बंदी आदेश निव्वळ कागदी घोडा ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाने आदेश काढले, मात्र त्याची अंमलबजावणी कोण व कशी होत आहे, याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी तपासणी पथक किंवा जबाबदार सुरक्षा कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात तसे नियोजन करण्यात आलेच नसल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासन फक्त आदेश काढते, त्याच्या अंमलबजावणीचे काय हा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे बंदी असल्याचे माहिती असूनही व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असताना धोकादायक झेनिथ धबधबा परिसरात जाणे किती योग्य हाही प्रश्न आहे. क्षणिक आनंद घेण्यासाठी जीवावर बेतणारी मोठी चूक व बेदरकारी टाळता येऊ शकते की नाही याचाही विचार होण्याची गरज आहे, मात्र प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार त्याचे नियोजन व कडक अंमलबजावणी झाली असती तर ही दुर्घटना टळली असती, अशाही प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत. बंदी आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली असती, तर कदाचित दोन महिला व एक आठ वर्षीय चिमुकलीचा बळी गेला नसता असे बोलले जात आहे.
झेनिथ धबधबा परिसरात मंगळवारी दुर्दैवी घटना घडल्यावर बुधवारी खोपोली नगरपालिका व पोलीस प्रशासन जागे झाले. बुधवारी मुख्याधिकारी अनुप दुरे व पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी झेनिथ धबधबा परिसर, पाणी प्रवांह व घटना स्थळाची पाहाणी केली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही या संदर्भातील उपाययोजनांबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आता मान्सून काळ असेपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत झेनिथ धबधबा इन्ट्री पॉईंटवर नगरपालिका व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
झेनिथ धबधबा परिसरात जाण्यास बंदी असल्याबाबत येथील सर्व इन्ट्री पॉईंटवर पोलीस प्रशासन व नगरपालिकेकडून फलक लावण्यात आले आहेत, तसेच फिरत्या पथकामार्फत कोणीही आत जाऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यात येते. पावसाचा हंगाम असेपर्यंत त्या परिसरात पूर्ण दिवस नगरपालिका कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
-अनुप दुरे, मुख्याधिकारी, खोपोली पालिका