Breaking News

कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना 368 कोटी रुपयांचे वाटप

उर्वरित पात्र ठेवीदारांना रक्कम घेऊन जाण्याचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 543 कोटींचा आर्थिक घोटाळा झाला. या पार्श्वभूमीवर बँकेकडे पाच लाखांपर्यंत ठेव असलेल्या 38 हजार ठेवीदारांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 376 कोटी रुपयांपैकी 368 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असून उरलेली रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशनला (डीआयसीजीसी) परत करावी लागेल. तसे होऊ नये यासाठी ज्या ठेवीदारांनी अद्याप आपले पैसे नेले नाहीत त्यांनी बँकेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेकापचे माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा बँकेत आर्थिक घोटाळा झाला. त्यामुळे असंख्य ठेवीदार व खातेदार देशोधडीला लागले. या घोटाळ्याविरोधात सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी ठेवीदार संघर्ष समितीद्वारे आवाज उठविला आणि भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी विविध ठिकाणी पाठपुरावाही केला.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला. या बँकेचे खातेदार, ठेवीदार आपल्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी बँक शाखांमध्ये चकरा मारत होते. विवेक पाटील हे तुरूंगात जाण्यापूर्वी त्यांनाही विनंती करण्यात आली, मात्र पदरी निराशा आली. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कायद्यामुळे डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशन  (डीआयसीजीसी)नुसार कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखापर्यंतच्या ठेवी ठेवीदारांना परत देण्यात येत आहेत. पाच लाखापर्यंत असलेल्या 376 कोटींपैकी 368 कोटी रुपये आतापर्यंत परत करण्यात आले आहेत, तर काही ठेवीदार पैसे नेण्यासाठी आले नाहीत. ‘डीआयसीजीसी’ची पैसे देण्याची मुदत संपल्यावर वाटप न झालेली रक्कम परत करावी लागते. चार महिने ही मुदत वाढवून घेण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांनी लवकरात लवकर बँकेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आजपर्यंत बँकेतील 12 हजार 500 ठेवीदारांनी केवायसी केलेले नाही. त्यामुळे त्यांना पैसे मिळालेले नाहीत. यापैकी बहुसंख्य ठेवीदारांच्या ठेवी पाचशे ते दोन-तीन हजार रुपये आहेत. यासाठी बँक कर्मचार्‍यांनी त्यांच्या गावात जाऊनही संपर्क करण्यास सुरुवात केली आहे, पण ठेवीदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आपली रक्कम न नेल्यास ती परत करावी लागणार आहे. कर्नाळा बँकेत पाच लाखांपेक्षा जास्त 2900 ठेवीदारांचे 160 कोटी रुपये आहेत. त्यांना पाच लाखापर्यंतच्या ठेवीची रक्कम दिली आहे. उरलेली रक्कम कर्जदारांकडून वसूल झाल्यावर नियमाप्रमाणे ‘डीआयसीजीसी’चे पैसे परत केल्यावर शिल्लक रकमेतून दिली जाणार आहे.
पाच लाखांच्या आतील पैसे ‘डीआयसीजीसी’मुळे परत
केंद्र सरकारच्या यापूर्वीच्या नियमानुसार बंद झालेल्या बँकेच्या खातेदारांना विमा संरक्षणाच्या माध्यमातून केवळ एक लाख रुपयेच परत मिळत होते. हे पैसे परत मिळण्यासाठी कालावधीही निश्चित नव्हता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनहितासाठी नवीन कायदा मंजूर केला. त्यानुसार खातेदारांना एक लाखाऐवजी पाच लाख रुपये बँक बंद झाल्यापासून 90 दिवसांत परत मिळणार आहेत. त्याचा लाभ कर्नाळा बँकेतील खातेदारांनाही झाला. व्यवसाय परवाना रद्द झालेल्या कर्नाळा बँकेतील खातेदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) या केंद्र सरकारने केलेल्या या नवीन कायद्यामुळे पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळाल्या. नव्या नियमानुसार पाच लाखांपेक्षा कमी रक्कम असलेल्या 49,423 ठेवीदारांचे एकूण 240 कोटी रुपये होते. ही रक्कम मोदी सरकारच्या निर्णयानुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून परत मिळाली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply