नवी मुंबईत सर्दी ताप, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
शहरात बदलत्या हवामानामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात मध्यवर्ती असलेल्या वाशी पालिका रुग्णालयातही बाह्यरुग्णसेवेत वाढ झाल्याची माहिती पालिका रुग्णालयांच्या डॉक्टरांनी दिली आहे. मागील काही दिवसापासून सतत होणार्या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. कधी अचानक थंडीमध्ये वाढ होत आहे. तर मध्येच दोन दिवस पुन्हा गरम तर पुन्हा रात्रीच्या थंडीत होणारी वाढ यामुळे सतत शहरात बदलत्या हवामानामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबई शहरात मागील काही दिवसात वातावरणात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुले तसेच नागरीक यांच्या आजारी पडण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे खासगी क्लिनिकबाहेरही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. वाशी येथील महापालिका रुग्णालयात असलेल्या बाह्य रुग्णविभागात दिवसाला सरासरी 1 हजार ते 1100 पर्यंत बाह्यरुग्ण पाहायला मिळतात, परंतू सातत्याने होणार्या वातावरणातील बदलामुळे पालिका रुग्णालयातील संख्याही वाढू लागली आहे. मागील सोमवारपासून सातत्याने बाह्यरुग्ण संख्येत वाढ होत आहे. सकाळच्यावेळी मॉर्निंग वॉक करणार्यांची संख्याही नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात असून सातत्याने होणार्या बदलामुळे डोकेदुखी तसेच ताप सर्दी तसेच खोकला वाढत आहे. सकाळी व सायंकाळच्यावेळी हवेत बदल होत असल्याने अचानक थंडीही जाणवत आहे,त्यामुळे आजारी पडणार्यांची संख्या जास्त असल्याचे मत डॉक्टर व्यक्त करत आहेत.
काळजी घेण्याचे आवाहन
पालिका रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग असून या ठिकाणी सातत्याने रुग्णंची संख्या पाहायला मिळते. दिवसाला एक हजार ते 1100 रुग्ण आढळून येतात, परंतु शहरातील वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने असंतुलीत वातावरणामुळे रुग्ण आजारी पडण्याच्या संख्येत वाढ झाली असून दिवसाला हजार ते 1100 असलेली रुग्णसंख्या 1500च्या पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांनीही तब्बेतीबाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे नवी मुंबई महापालिका वाशी सार्वजनिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले.
सततच्या हवेतील बदलामुळे रुग्णांची संख्या वाढत असून ताप ,सर्दी, खोकला याचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
-डॉ. श्याम मोरे