पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल पश्चिम मंडळ, लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समिती आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच सुरू होणार्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 24) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
उलवे नोड येथील उलवे येथील भूमिपुत्र भवनात झालेल्या या प्रशिक्षण शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, अरुणशेठ भगत, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, भारत विकास ग्रुपचे उपाध्यक्ष विपिन टिक्कू, जनरल मॅनेजर मदन भोसले, सुदर्शन भालेराम आदींसह प्रकल्पग्रस्त आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि.बा. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सिडकोच्या स्थापनेपासूनच लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांनी जमीन बचाव समिती या नावाने संघर्षाला सुरुवात केली होती. या संघर्षामध्ये 1977 सालापासून मी साहेबांबरोबर काम केले याचा मला अभिमान आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांचे दैवत स्व. दि.बा. पाटीलसाहेबांमुळे आणि लढवय्या हुतात्म्यांमुळे या भूमीला एक वेगळा इतिहास लाभला आहे. ‘दिबां’नी प्रकल्पग्रस्तांसाठी लढा दिला, सामाजिक विषयांसाठी आंदोलन केली. आपल्या परिसरात साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण होत असतील, तर त्याचा फायदा इथल्या प्रकल्पग्रस्तांना झालाच पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे.
प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार आहे, पण काही जण मुद्दाम संभ्रम पसरवण्याचे काम करीत आहेत, असे सांगत आमदार महेश बालदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचे नाव घेत याच महोदयांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत विमानतळाच्या एखाद्या टर्मिनलला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी भूमिका घेतली होती. आम्ही त्या बैठकीला उपस्थित होतो. मी आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांनी त्या बैठकीत उठून उभे राहत विमानतळाला नाव दि.बा.पाटीलसाहेबांचेच द्यावे लागेल, असे उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव दिले जाईल व हे यश जर कोणाचे असेल, तर ते आपण जो लढा उभारला त्याचे आहे, असेही ते म्हणाले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव दिले जाईल याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाहीये, असा विश्वास ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण शिबिरास नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, नंदराज मुंगाजी, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, योगिता भगत, निकिता खारकर, प्रवीण खंडागळे, वितेश म्हात्रे, धीरज ओवळेकर, सचिन घरत, प्रिया शिंदे, जितेंद्र म्हात्रे, सी.एल. ठाकूर, विनोद म्हात्रे, राजेश गायकर, सीमा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा
नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …
RamPrahar – The Panvel Daily Paper