39 लाख 20 हजारांची तरतूद ; विविध उपाययोजनांची आवश्यकता
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील 55 वाड्या आणि 17 गावांना यंदा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आह. त्यासाठी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला असून 39 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
दरवर्षी पावसाळा संपताच तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना दुर्गम भागातील वाड्या तसेच काही गावांना करावा लागतो. चार मोठी धरणे आणि पातळगांगा नदी एवढी प्रचंड पाण्याची मुबलकता असतानाही पाणीटंचाईची समस्या खालापूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजली आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर काही ठिकाणी टँकरची गरज पडते त्यासाठी यंदाच्या टंचाई निवारण कृती आराखड्यात सतरा गावे आणि 55 वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन विंधन विहीर, घेणे टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरीतील गाळ काढणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपलब्ध होत आहे.उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईसाठी सरकारने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यांचाही निवारण कृती आराखडा गोषवाराही तयार करण्यात आला आहे. जून 2023 पर्यंत 39 लाख वीस हजार रुपये निधीची तरतूद केली आहे. तालुक्यातील पाताळगंगा नदीचा पन्नास टक्के पाणीसाठा विनावापर वाया जातो. याचा व्यवसायिक कारणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी पिण्याच्या वापरासाठी उपाययोजना होत असल्याचे टंचाईचे सावट दरवर्षी डोकावते. दरवर्षी लाखो रुपये पाणी टंचाईसाठी खर्च करण्यात येतो मात्र दरवर्षी पाणीटंचाईच्या गावाच्या संखेत वाढ मात्र होत असते. शासनस्तरावर कागदी घोडे नाचण्याचा प्रकार केला जातो अशीही प्रतिक्रिया सर्व सामान्यातून व्यक्त होत असते.पाणी टंचाई निवारण कृती आराखड्यासाठी 2020-21 साठी 74 लाख 75 हजार, 2021-22 साठी 24 लाख 75 हजार, 2022- 23साठी 39 लाख 20 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी
खालापूर तालुका टंचाई यादीत सातत्याने आहे. 2016 -17 वर्षी टंचाईग्रस्त यादी 30 गावे 40 वाड्या मिळून 70 संख्या होती. 2017- 18 ला आकडेवारी फरक नव्हता 2018- 19 वर्षात 27 गावे 39 वाड्या अशी एकूण 66 ठिकाणी तीव्र पाणीटंचाई होती. 2019- 20 च्या पाणीटंचाई कृती आराखड्यात 27 गावे 39 वाड्यांचा समावेश करण्यात आला यामध्ये 21 गावे आणि 31 वाड्या अशा 52 ठिकाणी टंचाई होती. 2020- 21 ला 27 गावे 39 वाड्या टंचाईग्रस्त यादीत होत्या. त्यासाठी पाऊण कोटीची तरतूद करण्यात आली होती. 2021 -22 मध्ये टंचाई निवारण कृती आराखड्यात 18 गावे आणि 44 वाड्यांचा समावेश होता. तर 2022- 23 मध्ये 17 गावे आणि 55 वाड्यांचा समावेश त्यांचाही आराखड्यात नमूद करण्यात आला आहे.
नवीन विंधन विहीरींसाठी आवश्यक निधी
तालुक्यातील 17 गावे आणि 51 वाड्यांमध्ये टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी 34 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे तर, सार्वजनिक विहिरींचा गाळ काढण्यासाठी दोन लाख 50 हजार आवश्यक आहे. तसेच नवीन विंधन विहिरींसाठी दोन लाख 70 हजार आवश्यक निधी आहे.