सांगली : प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला.
मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. या बैठकीस पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप पवार, प्रशासन अधिकारी सुनील माने हेही उपस्थित होते. या वेळी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अशोक गायकवाड, तर व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बारसिंग यांची एकमताने निवड करण्यात आली. याशिवाय शशिकांत तारळेकर, मन्सूर पटेल, राजाराम पवार, सुधीर सुतार, जयदीप पदमन, विकास आबदर, विद्युलता पवार, उषा शितोळे, लक्ष्मण गायकवाड यांची संचालकपदी निवड झाली. सर्व नवनियुक्त संचालकांचा मनमंदिर बँकेेचे चेअरमन तथा माजी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड यांनी सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘मनमंदिर’च्या सर्व कर्मचार्यांनीही याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, भूपेंद्र बारसिंग यांचा निवडीबद्दल माहुली गावात जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सरपंच तथा विद्यमान पोलीस पाटील नंदकुमार माने, उपसरपंच डॉ. देवेंद्र बारसिंग, माजी सरपंच राजेंद्र बारसिंग, युवा नेते शकील तांबोळी, दत्तात्रेय बारसिंग, महेंद्र बारसिंग, युवराज बारसिंग, गोपाळ फाळके, तानाजी बारसिंग, सिकंदर आतार, माधव माने, सतीश माने, नाथबाबा बारसिंग यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
या वेळी पोलीस पाटील नंदकुमार माने म्हणाले की, भूपेंद्र बारसिंग हे मनमंदिर को.ऑप. बँकेच्या विटा शाखा व्यवस्थापकपदी कार्यरत असून आता त्यांची मनमंदिर पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्वांना अभिमान आहे. बारसिंगसाहेब हे एक सामाजिक बांधिलकी जपणारे तसेच शांत व मनमिळावू असे व्यक्तिमत्त्व आहे. मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. मोठा भाऊ इंजिनियर, लहान भाऊ डॉक्टर आणि हे बँकींग क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. सर्व कुटुंब सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित असल्याने त्यांच्या परिवाराचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. सत्कार समारंभाचे प्रास्ताविक दत्तात्रेय बारसिंग यांनी केले, तर उपस्थितांचे आभार महेंद्र बारसिंग यांनी मानले.