Breaking News

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जीवनावरील माहिती ’क्यूआर कोड’द्वारे होणार प्रसारित

पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील महापालिकेच्या पनवेल शहरात असलेल्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात प्रकल्पग्रस्तांचे आधारवड दिवंगत दि. बा. पाटील यांचे पुतळा स्वरूपात स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या जीवनावरील माहिती अद्ययावत प्रणाली असलेल्या ’क्यूआर कोड’द्वारे प्रसारित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने त्यांचे सोबती तसेच कार्यकर्त्यांनी लेखन स्वरूपात माहिती पाठविण्याचे आवाहन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, कष्टकरी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. नगराध्यक्ष, पाचवेळा आमदार, विरोधी पक्षनेते, दोन वेळा खासदार अशी दमदार कारकीर्द कामगिरी दि. बा. पाटील यांची राहिली आहे. आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधिमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरूंगवासही भोगला. त्यामुळे त्यांचे हे समाजहिताचे कार्य नव्या पिढीला कायम स्मरणात रहावे यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांची महती मोठी आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव फक्त पनवेल, उरण, रायगड, नवी मुंबई, मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, देशपातळीवर आहे. त्याला अनुसरून लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासोबत काम केलेले मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, आठवणी लेखन स्वरूपात तयार करून 5 मार्चपर्यंत पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या पनवेल शहरात असलेल्या महात्मा फुले सभागृहात (आगरी समाज हॉल) जमा करायच्या आहेत. या सर्व लेखनाचे संकलन करून ते लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात येणार्‍या स्व. दि. बा. पाटील यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply