पनवेल : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येत आल्याने बाजारपेठांमध्ये भगवे ध्वज, टी-शर्ट, कुर्ते, पट्टे, शिवरायांचे फोटो आणि पुतळे यांनी दुकाने सजलेली दिसत आहेत. सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मराठी तरुणांमध्ये उत्साह सळसळतो. शिवजयंती येत्या रविवारी म्हणजे 19 फेबु्रवारीला असल्याने ती कशी साजरी करायची, त्यासाठी शिवज्योत कोणत्या किल्ल्यावरून आणायची याची चर्चा सुरू झाली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पनवेलची बाजारपेठही सजली आहे. शहरातील दुकानांमध्ये भगवे ध्वज, भगवे टी-शर्ट, भगवे कुर्ते मोठ्या प्रमाणात विक्रीला आहेत. मोहम्मद सईद यांच्या फर्स्ट चॉइस दुकानातील दिलीप रॉय यांनी सांगितले की, 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत किंमत असलेले कमीत कमी 500 ध्वज, एक हजार कुर्ते व 300 पट्टे या चार दिवसांत विकले जातात. यामध्ये आम्हाला जास्त नफा मिळत नाही, पण त्यामुळे आमचे नाव होते. म्हणून आम्ही या काळात त्याची विक्री करीत असतो.
दरम्यान, पनवेलमधून जाणार्या महामार्गावर राजस्थानहून आलेली अनेक कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध प्रकारचे व आकारातील पुतळ्यांची विक्री करतात. यामध्ये सिंहासनावर बसलेले, अर्धपुतळा व अश्वारूढ असलेल्या महाराजांचे पुतळे विक्रीला मांडलेले दिसत आहेत. याच्या किमती ही 100 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत आहेत. राजस्थानी कुटुंब अनेक वर्षे शिवजयंतीच्या काळात हे पुतळे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …