Breaking News

अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबागचा पांढरा कांदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. लहान कांदा 150 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढर्‍या कांद्याला मागणी वाढली आहे.
रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या या पांढर्‍या कांद्याची लागवड तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये केली जाते. अभ्यासकांच्या माहितीनुसार या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. खरीप हंगामातील भातकापणीनंतर अलिबाग तालुक्यात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते. भातकापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकतो. हा जमिनीतील ओलावा पांढर्‍या कांद्याच्या लागवडीसाठी पुरेसा असतो. या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाऊ लागली.
मागील वर्षी 223 हेक्टरवर पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा अलिबाग तालुक्यात 245 हेक्टर क्षेत्रावर पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढर्‍या कांद्याला मागणी वाढली आहे.
मुंबई, पुण्यासारख्या महानगरातून कांद्यासाठी मोठी मागणी केली जात आहे. सध्या लहान कांदा 150 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने पांढरा कांदा विकला जात आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply