Breaking News

स्वच्छतेत सुधारणेसाठी गतिमान कामे करा

नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर यांचे अधिकार्‍यांना निर्देश

नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई शहराची प्रतिमा नागरिकांच्या मनात स्वच्छ शहर म्हणून ठसलेली असल्याने शहर स्वच्छतेबाबत आणखी सुधारणांची अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने क्षेत्रीय कर्मचार्‍यांपासून ज्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी आहे, अशा नोडल अधिकार्‍यांपर्यंत सर्वांनी आपण करीत असलेले काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी, असे निर्देश देत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छतेच्या दर्जात कोणत्याही प्रकारे ढिसाळपणा चालणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले.
स्वच्छ सर्वेक्षण 2023ला सामोरे जाताना स्वच्छतेची कामे गतिमान पद्धतीने करावी, यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. स्वच्छतेशी संबंधित सर्वच बाबींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असून कचरा वर्गीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आयुक्तांनी कचरा वर्गीकरणाचा विभागनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशित केले. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो अशा सोसायट्यांनी आपल्या आवारातच ओल्या कचर्‍याचे प्रक्रिया प्रकल्प राबविणे बंधनकारक असून त्यादृष्टीने सर्व विभागाच्या विभागांनी स्वच्छता अधिकारी व निरीक्षकांसह आढावा घेऊन सोसायटी याची अंमलबजावणी करेल याकडे बारकाईने लक्ष द्यावे. गावठाण व झोपडपट्टी भागातील कचरा वर्गीकरणावरही स्थानिक अडचणी लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणच्या संबंधित अधिकार्‍यांनी त्यावर उपाययोजना कराव्यात अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. सर्वच विभागांमध्ये एकल प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून दंडात्मक रक्कम वसूल केली जात आहे. ज्या ठिकाणाहून प्लास्टिकच्या पिशव्या व एकल प्लास्टिक साठा करून वितरीत केले जाते त्याविरोधात धडक मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या दृष्टीने एपीएमसी मार्केट परिसरात अधिक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. व्यापारी क्षेत्रातील रस्ते सफाई सकाळप्रमाणेच रात्रीही होत असते. ही रात्रीची सफाई योग्यरितीने होत असल्याचे पर्यवेक्षण केले जावे व महानगरपालिकेने रस्ते सफाई केल्यानंतर रस्त्यावर कचरा टाकणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. विशेषत्वाने खाद्यपदार्थांच्या विक्रेत्या दुकनदारांनी आपल्याकडील कचरा वर्गीकृत केला जाईल व त्याचे संकलन योग्यप्रकारे होईल, याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. दुभाजकातील स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये असे स्पष्ट करीत आयुक्तांनी सी अ‍ॅण्ड डी वेस्टबाबतचे धोरण अद्ययावत करण्याचे निर्देशित केले. पावसाळापूर्वीची नाले सफाईची कामे विहित वेळेत सुरू होतील याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर विभागप्रमुख, नोडल अधिकारी, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत सतर्क रहा
सर्वच विभागांमध्ये एकल प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून दंडात्मक रक्कम वसूल केली जात आहे. होळी सणामध्ये फुग्यांच्या ऐवजी मोठ्या प्रमाणावर पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन त्यादृष्टीने यंत्रणेने आत्तापासूनच सतर्क रहावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply