लेखी आश्वासनाशिवाय मागे न हटण्याचा कामगारांचा निर्धार
उरण : प्रतिनिधी
भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सीडब्लूसी) कंपनीविरोधात स्थानिक भूमिपुत्र असलेल्या व ज्यांच्या जमिनी या कंपनीसाठी संपादित झाल्या अशा बेरोजगार युवकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 27 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. साखळी उपोषण सुरू असूनही कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी (दि. 3) कामगारांनी गेटबंद आंदोलन केले. या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांसह रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरिटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. जोपर्यंत मागच्या पूर्ण होत नाहीत, लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत गेट बंद आंदोलन सुरूच ठेवू असा निश्चय यावेळी बेरोजगार कामगारांनी केला. गेटबंद आंदोलनात ठाकरे गटाचे मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शिवसेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, भाजपच्या वतीने भेंडखळ ग्रामपंचातच्या विद्यमान सरपंच मंजिता पाटील यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. न्हावा शेवा बंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आदींनी मध्यस्थी करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. आंदोलन स्थळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.