Breaking News

राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल; भाजपच्या कोकण दौर्‍याला पनवेलपासून सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे अत्यावश्यक सेवेत काम करीत आहेत अशा कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेची काळजी शासन घेऊ शकले नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासह इतरांना संसर्ग होत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांचे सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा घणाघाती हल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 19) चढविला. ते कळंबोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजप आमदारांच्या कोकण दौर्‍याला मंगळवारपासून पनवेल तालुक्यातून सुरुवात झाली. माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, महेश बालदी, भाई गिरकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, रमेश पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी आमदार प्रमोद जठार आदी या वेळी उपस्थित होते.  
कोकणातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दोनदिवसीय दौर्‍याला पनवेलपासून सुरुवात झाली. भाजप नेते व आमदारांनी सर्वप्रथम कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्था पाहणी केली. रुग्णांना योग्य उपचार देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकार्‍यांना देऊन उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांना आश्वस्थ करण्यात आले. त्यानंतर कळंबोलीतील देवांशी इन हॉलमध्ये सोशल डिस्टन्स आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून अत्यंत शिस्तबद्ध पत्रकार परिषद झाली.  
या वेळी दरेकर म्हणाले की, मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यांच्यामुळे कुटुंबीयही बाधित होत आहेत. या सर्वांची हे संकट टळेपर्यंत कामाच्या ठिकाणीच राहाण्याची व्यवस्था करावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आम्ही सर्वांनी शासनाकडे मागणी केली होती. टाटा मंत्रा, इंडिया बुल्स याशिवाय अनेक पर्याय आम्ही त्यांना दिले होते, मात्र राज्य शासनाने या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणाम रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादात राज्यात तालुका पातळीवर क्वारंटाइन सेंटर सुरू करू शकलो नाही, अशी स्पष्ट कबुली दिली असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईत असणार्‍यांना गावाला जाता येत नसल्याचे सांगून हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला आम्ही केंद्राची मदत घेणार नाही असे ते सांगत होते. आता मात्र केंद्राकडून मनुष्यबळ मागावेच लागेल. कोणतीही गोष्ट प्रतिष्ठेची न करता केंद्राबरोबरच समन्वय साधून एक योजना बनवावी जेणेकरून कोरोनाचे संकट परतवून लावता येईल, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना टीकेचे लक्ष केले. कोविड-19बरोबर दोन हात करत असताना पोलिसांवर ठराविक ठिकाणी वेगळ्या प्रवृत्तीचे व मानसिकतेचे लोक हल्ले करीत आहेत. असे असताना गृहमंत्री मात्र हल्ले खपून घेणार नाही इतकेच बोलताहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे दरेकर म्हणाले. कोविड चाचण्यांसाठी सर्वसामान्यांकडून पैसे घेतले जात असल्याच्या प्रश्नावर ते दरेकर म्हणाले की, याबाबत आम्ही अगोदरच राज्य शासनाकडे मागणी केली आहे. या सर्व चाचण्या मोफत होणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांना एकही रुपया खर्च येता कामा नये ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे लावून धरू. मुंबईच्या वरळी येथील लॅबमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट जास्त येत असल्याने सरकारने त्या लॅबवरच बंदी घातली असल्याचा आरोप दरेकर यांनी या वेळी केला.
कोकणवासीयांनी शिवसेनेला कायम झुकते माप दिले. साहजिकच मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या अनेक अपेक्षा होत्या, मात्र ते कोकणी माणसाच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे आगामी काळात कोकणातील जनता शिवसेनेला धडा शिकवायल्या राहणार नाही, असे दरेकर म्हणाले.
कोरोनानंतर जी परिस्थिती येणार आहे त्याबाबत नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याचे कुठलेही नियोजन आघाडी सरकारकडे नसल्याची टीका दरेकर यांनी केली. राज्य सरकार जनतेच्या रक्षणासाठी गंभीर नसले तरी विरोधी पक्ष जागरूक आहे. त्या अनुषंगाने काम करत जनतेच्या भल्यासाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा करणार आणि या कोकण दौर्‍याचे जनतेसाठी चांगले फलित होईल. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे त्यातून नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार सुरुवातीच्या काळात उपाययोजना माहीत असूनही करू शकले नाहीत, याकडे लक्ष वेधले. सुरुवातीच्या काळात व्यावसायिक आपली हॉटेल्स कोरोनाच्या योद्ध्यांकरिता उपलब्ध करण्यास तयार होते. पनवेलमध्ये इंडिया बुल्ससारख्या इमारती घेतल्या त्याप्रमाणे मुंबईत अनेक नवीन इमारती असूनही त्या ताब्यात घेतल्या नाहीत. केंद्रीय समिती हे करावे लागेल असे सांगत असूनही आघाडी सरकारने राजकारण केले.  त्याचे परिणाम आज ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेलला भोगावे लागत आहेत हे या सरकारचे अपयश असल्याचे सांगून त्यांनी चव्हाण यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

गंभीर नसलेले आघाडी सरकार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल परिसरातून मुंबईला अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अनेक जण जातात. त्यापैकी काहींना कोरोना झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग होत असल्याने रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातून मुंबई शहरात जाऊन सेवा देणार्‍या सेवाकर्मींची कोरोना संकट संपेपर्यंत मुंबईतच राहाण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करा, अशी मागणी वारंवार करूनही राज्य सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. समन्वयाचा अभाव आणि गंभीर नसलेले हे राज्याचे आघाडी सरकार आहे, मात्र आम्ही जनतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहू, असे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.

आघाडी सरकारचे समस्यांकडे दुर्लक्ष -आमदार महेश बालदी
उरणचे आमदार महेश बालदी यांनी शासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सांगितले. रायगड जिल्हाधिकार्‍यांनी मद्य विक्रीचे दुकान सुरू करण्याची मुभा दिली, परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून ते सुरू करून दिले जात नाहीत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, उरण या परिसरातून लोक चौक, मोहोपाडा, पेण येथे दारू आणण्यासाठी येतात. या कारणाने संबंधित ठिकाणी संसर्ग होण्याची भीती आहे. याला जबाबदार शासन आणि प्रशासकीय यंत्रणा असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर मच्छीमार बांधवांच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद करून मच्छीमार व शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका घ्या, असे राज्य शासनाला सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply