सालाबादप्रमाणे यंदाही देशभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा होईल. शहरी भागांतील कार्यालयांमध्ये महिला शक्तीचे गुणगान गाणारे कार्यक्रम होतील. सरकारी पातळीवरदेखील बरेच कार्यक्रम नेमाने पार पाडले जातील. अनेक सुसंस्कृत घरांमध्ये घरातील महिला वर्गाचे थोडेफार कोडकौतुक होण्याचीदेखील शक्यता आहे. तसे होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल कारण महिला दिन हा उत्सवी स्वरुपात साजरा व्हावा, त्याद्वारे समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत सकारात्मकता यावी असे सार्याच सुसंस्कृत विश्वाला वाटत असते. जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध लेखन किंवा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातील. टीव्ही वाहिन्यांवर दिवसभर महिला शक्तीचा उदो-उदो केला जाईल, परंतु हे सारे झाले एका दिवसाचे वास्तव. वर्षाचे बाकीचे 364 दिवस आपण महिलांचा काय सन्मान ठेवतो याचे आत्मपरीक्षण खरे तर महिला दिनाच्या निमित्ताने व्हायला हवे. 1909साली अमेरिकेतील एका कारखान्यात काम करणार्या श्रमिक महिलांनी संपाचे हत्यार उपसले आणि दुय्यम वागणुकीचा उघडपणे धिक्कार केला. त्यांच्या लढ्याला यश आले आणि स्त्री-पुरुष समानतेच्या आग्रही प्रतिपादनाला सुरुवात झाली. मग जगभरात अनेक देशांमध्ये ही भूमिका ठामपणाने घेत अखेर 8 मार्चचा दिवस हा ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ म्हणून निश्चित झाला. स्त्री-पुरुष समानतेची जाणीव विश्वव्यापी व्हावी म्हणून जागतिक महिला दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले. प्रारंभी हा दिवस जागतिक श्रमिक महिला दिन म्हणून ओळखला जात होता, परंतु कालांतराने त्यातील श्रमिक हे संबोधन मागे पडले व एकंदरीतच स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. गेल्या 114 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महिलांनी अनेक क्षेत्रांतील क्षितिजे पादाक्रांत करून दाखवली आहेत. पुरुषांपेक्षा बर्याच अंशी स्त्रिया अधिक सक्षम असल्याचेही दिसून येत आहे. कित्येक विराट कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रमुख पदी आज स्त्रियाच आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. मानव वंशाचा विच्छेद करू पाहणार्या कोरोना विषाणूला अटकाव करणारी लस अल्पावधीत शोधून काढणारी संशोधिका एक स्त्रीच होती हे कुणीही विसरता कामा नये. अशा अनेक अज्ञात पराक्रमी स्त्रिया कर्तृत्वाची नवनवी शिखरे गाठत आहेत. भारतात स्त्रीला माता-भगिनी-देवी असे म्हटले जाते. भारतीय समाज स्त्री-शक्तीला पुराण काळापासून पूजत आला आहे. तथापि, याच भारतीय समाजामध्ये स्त्रियांना किती हीन दर्जाची वागणूक प्रसंगी मिळते याचीदेखील उदाहरणे तितकीच आहेत. एकीकडे स्त्रीला देवीसमान मानायचे किंवा माता-भगिनी असे संबोधायचे आणि दुसरीकडे तिच्यावर अनन्वित अत्याचार करायचे हा दुटप्पीपणा आपल्या देशात आढळत आला आहे. त्यामुळेच स्त्री-शक्तीचे महत्त्व मान्य करून सन्मानपूर्वक दर्जा महिला वर्गास मिळू देण्याची मानसिकता प्रत्येकाने बाळगायला हवी आहे. याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली, तरीदेखील एक अभूतपूर्व सामाजिक क्रांती आपल्या देशात होईल, परंतु अजूनही ते तितकेसे सोपे नाही. स्त्रियांना समानतेची वागणूक देण्यासाठी पुरुषप्रधान समाजाला आधी आपला फुकाचा अहंकार सोडावा लागेल. त्यासाठी प्रबोधनाची नितांत गरज असून हे काम फक्त महिला दिन साजरे करून होण्यासारखे नाही. ‘एकाच या जन्मी जणू फिरूनि नवी जन्मेन मी’ या गीतातील ओळीप्रमाणे महिला शक्तीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची खरी गरज आहे.
Check Also
विधायक कार्यासाठी शिक्षकांच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर
शिक्षक संघाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तअखिल भारतीय प्राथमिक संघ पनवेल शाखेचा …