Breaking News

एमपीएससीच्या नवी मुंबईतील सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या 87व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन समारंभास आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुनील अवताडे आदी उपस्थित होते. अध्यक्ष निंबाळकर यांनी अपर मुख्य सचिव गद्रे यांचे स्वागत केले.
या नव्या इमारतीमुळे आयोगाच्या कामकाजाला आणखी गती येणार असल्याचे गद्रे या वेळी म्हणाले. लोकसेवा आयोगाच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
आयोगाचे नवीन कार्यालय बेलापूर सीबीडी सेक्टर 11मधील त्रिशूल गोल्ड फिल्ड येथे स्थलांतरित होत आहे. हे कार्यालय भाडेतत्वावर घेण्यात आले असून 11 मजली इमारतीतील सात मजले आयोगाला देण्यात आले आहे. यामध्ये आयोगाचे अध्यक्ष, सदस्य यांच्या दालनासह मुलाखत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, मूल्यांकन कक्ष, हिरकणी कक्ष, परीक्षा विभाग, सरळसेवा विभाग, तपासणी विभाग अशा प्रत्येक विभागाला स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. आयोगाचे स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीसाठी बेलापूर येथे जागा उपलब्ध झाली असून लवकरच बांधकाम सुरू होणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply