महाड : प्रतिनिधी
महाड औद्योगिक वसाहतीमधील पॅनोरमा केमिकल या डीस्टीलेशनचे काम करणार्या छोट्या कारखान्यातून बुधवारी (दि. 13) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वायूगळती झाली. यामुळे या परिसरात दाट धुकेसदृश वातावरण निर्माण झाले. सुमारे दोन तासांनी ही वायूगळती आटोक्यात आणली. या कंपनीतून कर्मचारी बाहेर पळून गेल्याने कंपनीत माहिती देण्यास कोणीच उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
दाट धुराने समोरचे काही दिसणे बंद झाले होते आणि डोळ्यांनादेखील याचा त्रास जाणवत असल्याची तक्रार जिते गावातील ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर या ठिकाणी महाड औद्योगिक वसाहतीमधील तज्ञ पथक आणि औद्योगिक अग्निशमन पथक दाखल झाले. वायूगळती झाल्याने कंपनीतील रात्रपाळीवर असलेले दोन कामगार पळून गेले. यामुळे कंपनीतील प्रक्रिया समजणे कठीण होते. अखेर ज्या टाकीतून वायू बाहेर पडत होता त्यावर पाण्याचा फवारा मारून कुलिंग प्रोसेस करण्यात आली. यामुळे जवळपास दोन तासांनी परिसरातील धूर कमी झाला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हा लहान प्लांट असून यामधून ईडीसी डीस्टीलेशन करून स्वच्छ करून पाठवून देण्याचे काम केले जाते. बुधवारी हे काम करत असताना रिअॅक्टरची व्हेपर लाईन लिकेज झाली. यातून हा वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला. हा वायू मानवी आरोग्यास धोकादायक नसला तरी ज्वलनशील असल्याने काळजी घेण्याचे स्थानिक ग्रामस्थांना सांगण्यात आले. घटनास्थळी दोन फायर फायटर गाड्या दाखल झाल्या होत्या. या कारखान्यात
जेमतेम दोन कामगार काम करत होते. तेदेखील स्थानिक ग्रामस्थांच्या भीतीने पळून गेले. महाड स्पॅम पथकाने ही वायूगळती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
वायूगळतीमुळे अंगाला खाज सुटणे, डोळे जळजळणे, घसा खवखवणे असा त्रास जाणवू लागला. जर हा वायू शरीरात गेला तर हृदयविकाराने मृत्यू होण्याची भीतीदेखील सी. डी.देशमुख यांनी वर्तविली.