पनवेल : वार्ताहर
पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता.
या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. अभिषेक व पूजेनंतर आरती करण्यात आली. त्यानंतर सोसायटीच्या सर्व धर्मिय लहान मुले आणि मुलींनी विठ्ठलाच्या वारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व महिलांनी फुगडी आणि रिंगण करुन टाळ वाजवून विठ्ठल नामाचा गजर केला. तसेच भजन, हरिपाठ, महाआरती, विठ्ठल भक्तीगीत असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्सचे बिल्डर आणि सोसायटी कमिटी यांच्यासह करंजाडे व पनवेल शहरातील सर्व भक्तांनी सहभाग घेतला होता.