महाड औद्योगिक क्षेत्राजवळील घटना : धुरामुळे नागरिकांना त्रास
महाड : प्रतिनिधी
महाड औद्योगिक क्षेत्रातील कांबळे तर्फे महाड या गावाजवळ असलेल्या बंद भंगार गोदामातील रासायनिक कचरा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावल्याने गेली चार दिवस धुमसणार्या आगीतून निघणार्या धुरामुळे परिसरातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील कळवले आहे.
कांबळे तर्फे महाड गावाजवळ असलेले भंगार गोदाम बंद होऊन दोन वर्ष झाले आहेत. मात्र या जागेत पडून असलेला रासायनिक कचरा उचलला गेला नाही. गेली चार दिवसापूर्वी या ठिकाणी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा कचरा जाळला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या रासायनिक कचर्यातून निघणार्या धुरामुळे ईसाने कांबळे गावातील मोहल्ला परिसराला याचा प्रचंड त्रास होत आहे. सकाळच्या सुमारास हा धूर वार्याच्या वेगाने गावापर्यंत जात असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. ज्या ठिकाणी हा कचरा जाळला गेला आहे त्या जमीन मालकाला देखील कळवले असले तरी त्याने देखील याकडे दुर्लक्ष केल्याची स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. कांबळे तर्फे महाड या गावाजवळ एक भंगार अड्डा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होता दोन वर्षांपूर्वी बंद झाला असून या ठिकाणी काही प्रमाणात रासायनिक कचरा तसाच पडून होता. या कचर्याला आग लागल्यामुळे गेली चार दिवस यातून धुराचे लोट निघत आहेत. या धुरामुळे परिसरातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होत आहे. सदर कचर्याला जमीन मालकाकडूनच आग लागल्याचा तक्रार स्थानिक ग्रामस्थ करत आहेत मात्र ही आग लावली की लागली याबाबत गावाचे सरपंच राघोबा महाडिक यांनी चौकशी करून कारवाई करण्याची विनंती महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे. रास्यानिक घनकचरा जमिनीवर टाकून भंगार मालक तसाच निघून गेला आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी भंगार विक्री करणारे मालक आपला माल जमिनीत तसाच ठेवून पळ काढतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे.
गावाजवळ असलेल्या एका खाजगी जागेत कचरा पेटवून दिल्याचे दिसून आले. याबाबत आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवले आहे. शिवाय ज्या जागेत हा कचरा आहे त्या जागा मालकाला देखील नोटीस बजावली जाईल.
– राघोबा महाडिक, सरपंच कांबळे तर्फे महाड