पनवेल : वार्ताहर
पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या चायनिज गाड्यांचा व्यवसाय सुरू असून, या गाड्यांवर खाद्य विक्रीपेक्षा मद्यपान करणारेच ग्राहक जास्ती असतात. यातूनच वादावादीचे प्रकार घडत असल्याने अशा प्रकारच्या गाड्यांवर पनवेल महानगरपालिका, तसेच संबंधित पोलीस ठाण्याने कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
पनवेल शहरातील मुख्य रस्त्यावर, तसेच परिसरातील गल्लीबोळात बेकायदेशीररीत्या चायनिज गाड्यांचे पेव फुटले असून कित्येक स्टेशन परिसरात सुद्धा चायनिज गाड्यांसह आमलेट पाव विकणार्या गाड्या वाढत चालल्या आहेत. या गाड्यांवर खाद्यपदार्थांपेक्षा मद्य पिणार्या ग्राहकांची संख्या जास्त असते. यातूनच ग्राहकांमध्ये भांडणाचे प्रकार घडतात. त्याचप्रमाणे त्या भागातून जाणार्या महिला वर्गांना सुद्धा अशा प्रकारच्या व्यक्तींमुळे त्रास होत असतो, तसेच या चायनिज गाड्यांवर विकण्यात येणारे पदार्थ मसाले, तेल आदी हे नित्कृष्ट दर्जाचे असल्याने ते आरोग्यास घातक आहेत. असे असताना त्याची बिनदिक्कतपणे विक्री केली जाते. अशा गाड्यांमुळे वाहतूक कोंडी सुद्धा होत असते, तरी अशा प्रकारच्या गाड्यांवर पनवेल महानगरपालिका व संबंधित पोलीस ठाण्याने कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.