पनवेल : वार्ताहर
खारघर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 363वी जयंती शंभुराजे मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. सकाळी 8 वाजता शंभूराजे मित्र मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी सीबीडी बेलापूरच्या किल्ल्यावरून शिवज्योत प्रज्वलित करून धावत आणली व उत्कर्ष हॉलमध्ये विधिपूर्वक पूजन करून ज्योतीची प्रतिष्ठापना केली. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी उपस्थितांनी संभाजी महाराजांच्या केलेल्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
नियोजित कार्यक्रमाप्रमाणे खारघर येथील जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या माध्यमातून सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे जवळपास 145 नागरिक बंधू-भगिनींकडून लाभ घेण्यात आला. सामजिक हेतूची जबाबदारी पार पाडत असताना युवकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विचार रुजविण्याकरिता सायंकाळी 7 वाजता खारघर येथील उत्कर्ष हॉलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर डॉ. वर्षा चौरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अत्यंत प्रभावी भाषेत डॉ. वर्षा चौरे यांनी संभाजी महाराजांबद्दलचा खरा इतिहास मंडला. त्या काळात ज्यांच्या हाती लेखणी होती त्यानी द्वेषापोटी व आकसाने इतिहास लिहिला, अत्यंत शूर पराक्रमी व बुद्धिमान राजाचा खोटा इतिहास जनतेसमोर आणला, पण आता सत्य बाहेर येत आहे. त्यामुळे 350 वर्षानंतर देखील जयंती उत्साहात साजरी होत आहे, असे डॉ. चौरे यांनी या वेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योजक शिशीकांत जाधव यांनी भूषवले, तसेच या वेळी खारघर मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील, बाळासाहेब फरतडे, डॉ. वीरसिंह कदम, युगनिर्माते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकर वसमाने आदी उपस्थित होते. खारघरमधील काही महिला मंडळांनी देखील भेट दिली. त्यात राजश्री कदम, संगीता पवार, सारीका क्षीरसागर, सरोज पतितवार, हेमा घाडगे, वंदना पोतदार, अनिता सोनुले, सारिका नेटके, शीतल शिंदे, नेहा पाटील आदी महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम नेटके यांनी केले व शंभुराजे मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहन कदम यांनी उपस्थितांचे तुळशीचे रोप भेट देऊन स्वागत केले. या कार्यक्रमासाठी शंभुराजे मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते बाळासाहेब आव्हाड, अखिलेश पवार, ऋषिकेश देवकर, अर्जुन घाटगे, तसेच भाऊसाहेब लबडे, शंकर सोनुले, प्रा. धायगुडे, राऊत साहेब, ज्ञानदेव नवले साहेब, आमोल शिंदे आदींनी अधिक मेहनत घेतली.