Breaking News

आसुडगावातून 13 बांगलादेशींना अटक

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

पनवेल : वार्ताहर
आसुडगाव सेक्टर-4 भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 13 बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने छापा मारुन अटक केली. या कारवाईत पकडण्यात आलेल्यामध्ये आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश असून हे सर्व बांगलादेशी नागरिक बांधकाम साईटवर मजुरी करून तसेच घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे.
आसुडगाव सेक्टर-4 भागात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी सदर बांगलादेशी नागरिकांना पकडण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार व त्यांच्या पथकाने आसुडगाव सेक्टर-4 मधील एका बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावरील संशयीत घरावर छापा मारला.
या वेळी घरात रमजान मंडल (वय 43), हबिबुल सहाजी (वय 38), निजामुद्दीन शेख (वय 27), समिन गाझी (वय 22), जियरुल गाझी (वय 42), साहेब मंडल (वय 40), कबिर गाझी (वय 46), रियाज शेख (वय 22), तसेच मफुजाबिबि खातुन (वय 27), शिवली शहजी (वय 28), शरीनाबिबि गाझी (वय 34) आणि आसमा मंडल (वय 29) हे त्याठिकाणी बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुळ गावाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून बेकायदेशीरीत्या भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानुसार या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

मजुरी करून वर्षभरापासून वास्तव्य

या बांगलादेशी नागरिकांकडून सात मोबाईल फोनदेखील जफ्त करण्यात आले आहेत. या कारवाईत अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरीक मजुरी करून मागील वर्षभरापासून या ठिकाणी राहत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यानुसार या सर्वांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम 1950 तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे. तसेच पुढील कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply