अलिबाग ः प्रतिनिधी
परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सरकारने मोफत बससेवा सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी कर्नाटक व मध्य प्रदेशसाठी रायगड जिल्ह्यातून नऊ विशेष एसटी बसेस सोडण्यात आल्या. अलिबाग आगारातून 110 मजुरांना घेऊन पाच बसेस कर्नाटककडे रवाना झाल्या. यात महिला-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असून त्यांना कर्नाटक राज्याच्या सीमेवर गुलबर्गापर्यंत सोडण्यात येणार आहे. बसमध्ये बसण्यापूर्वी सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रत्येक बसमध्ये केवळ 22 प्रवासी बसवण्यात आले. या वेळी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच एसटीचे अधिकारी उपस्थित होते. यापुढेही टप्प्याटप्प्याने बसेस सोडण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील मजुरांसाठी चार बसेस कर्जत आगारातून सोडण्यात आल्या. या बसेस परतीच्या प्रवासात त्या भागात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना घेऊन येतील, असे एसटीच्या अधिकार्यांनी सांगितले.