पंढरपूर ः प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमातून बारावीतील मुलीचे अपहरण करणार्या पाज जणांना अटक करण्यात आली आहे. अपहरण करणार्यांपैकी दोन जण हे तरुणीचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. आरोपींपैकी सुधाकर साळुंखे या तरुणीच्या आत्येभाऊला मुलीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने अपहरण केले असल्याची बाब समोर आली आहे. बारावीचा पेपर दिल्यानंतर केंद्रावरून ही मुलगी पालकांसोबत घरी निघाली होती. मुलीला घेऊन निघालेल्या पालकांच्या दुचाकीला पखालपूर मंदिराजवळ काही तरुणांनी बोलेरो जीप आडवी आणून अडवले. बोलेरोतील चार तरुणांनी पालकांना धमकावत बळजबरीने मुलीचे अपहरण केले. या अपहरण नाट्यातील दोन तरुण मुलीचे आत्येभाऊ असल्याचे पालकांनी ओळखले. त्यांनी तातडीने पोलिसांना या अपहरणाची तक्रार केली. परीक्षार्थी मुलीच्या अपहरणामुळे हादरलेल्या पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मोबाईलवरून यातील आरोपींचे लोकेशन तपासण्यात आले. हे आरोपी मुलींसह सातारा परिसरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सातारा पोलिसांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास बोलेरो गाडी पकडण्यात आली. यावेळी अपहरण करणार्यांना पोलिसांनी अटक करत मुलीची सुखरुप सुटका केली. यातील आरोपी सुधाकर साळुंखे हा या मुलीचा आत्येभाऊ असून त्याला या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र, लग्नासाठी मुलगी आणि कुटुंबीयांचा विरोध होता. अखेर आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने अपहरण करून लग्न करण्याची तयारी केली होती.