महाड : प्रतिनिधी
महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते. महाड येथील अद्ययावत एसटी बसस्थानक हे कोकणाच्या वैभवात व विकासात भर टाकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गीते गुरुवारी (दि. 7) यांनी महाड येथील नूतन एसटी स्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केला. या वेळी आ. निरंजन डावखरे, आमदार भरत गोगावले, आ. प्रवीण दरेकर, प्रांताधिकारी इनामदार, तहसीलदार पवार, एसटी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, महाड पं. स. सभापती सपना मालुसरे, महाडचे उपनगराध्यक्ष वजीर कोंडीवकर, महाड आगारप्रमुख कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गीते यांनी सांगितले की, भारतातील उत्तम परिवहन सेवा देण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाडकरांची गेल्या अनेक वर्षापासून कोकण रेल्वे महाड शहराला जोडण्याची असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगून ना. गीते म्हणाले की, साईडिंग मंजूर झाल्यानंतर पेण-अलिबागच्या धर्तीवर महाडकरिता स्वतंत्र प्रवासी वाहतूक सुरू करता येईल, असे आश्वासन ना. गीते यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी निगडित सेवा देणार्या महामंडळांना ताकद देण्याचे काम केले, असे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले, तर आ. निरंजन डावखरे यांनी एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढत असताना बसेसचीही संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे सांगत उत्पन्न व खर्चाचा मेळ बसवण्यासाठी पुरेशा बसेस प्रत्येक स्थानकांत पुरवाव्यात, अशी मागणी केली. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.