महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा वेगही वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. नऊ प्रचारसभा मोदी घेणार आहेत. रविवारी जळगावला पहिली सभा झाली. या वेळी मोदींनी महाराष्ट्राची प्रशंसा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीमचे कौतुक केले. मोदींच्या सभेने विरोधक निष्प्रभ झाले असून फडणवीसांच्या टीमचे कौतुक खूप काही सांगणारे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता जगभर प्रसिध्द असलेले नेते आहेत. अमेरिकेसह सर्वच देशांत त्यांनी आपल्या वक्तृत्वाने देशाची मान उंचावली आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीकडे पाहिले जाते. जगभरातील लोक भारतीय लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत येतात. वेगवेगळे प्रदेश, जाती, भाषा असे सारे काही असूनही एका लोकशाहीने या देशाला बांधून ठेवले आहे, याचे कौतुक परदेशातील लोकांना वाटते. महाराष्ट्रात आता लोकशाहीचा उत्सव होत आहे. 15 वर्षांनंतर भाजपने महाराष्ट्रात पुन्हा सरकार मिळविले. पाच वर्षांत मोठे काम झाले. आता पुन्हा भाजप महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल, असे चित्र मतदानासाठी अवघे आठ दिवस असताना राज्यभर दिसत आहे. आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मोदींनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्यांच्या पाच वर्षांतील कामाचे कौतुक केले. महाराष्ट्रात फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. तिकीट वाटपावेळीही फडणवीस यांचे वजन दिसून आले. आता खुद्द नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या रणभूमीवर येऊन देवेंद्र फडणवीस यांचे जळगावच्या जाहीर सभेत तोंडभरून कौत्ाुक केले. त्यामुळे आता फडणवीस हेच उद्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे किंग हे अधोरेखित झाले आहे. मोदींनी महाराष्ट्रात सरकारचे काम प्रशंसनीय असल्याचे सांगितले. देशभर मुंबई व महाराष्ट्राचे कौतुक होत आहे. जल मिशनचा उल्लेख करीत आता ही चळवळ व्यापक व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरायला हवा व शेतकर्यांवर पावसाच्या भरवशावर राहण्याची वेळ येता कामा नये यासाठी सर्वांनी मिळून काम करू, असे सांगताना महाराष्ट्राला झुकते माप देण्याचे जाहीर केले. महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस व त्यांच्या सहकार्यांना जनादेश दिला आहे. आता केवळ औपचारिकताच बाकी आहे, असे त्यांनी विश्वासाने सांगितले. मोदींच्या दौर्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. राष्ट्रवादी व काँगेसचे नेते कलम 370वरून राजकीय पोळी भाजत आहेत. त्यांचाही समाचार घ्यायला मोदी विसरले नाहीत. काश्मीर, लडाख हा जमिनीचा केवळ तुकडा नाही, तर भारतमातेचे मस्तक आहे, असेही त्यांनी सांगितले. पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही तिहेरी तलाक रद्द केले आणि वचन पूर्ण केले. यातही काँग्रेस आणि विरोधकांनी अडथळे आणले. या निर्णयाबद्दलही त्यांनी विरोधकांना आव्हान दिले. तुमच्यात हिंमत असेल, तर तिहेरी तलाक पुन्हा आणू, अशी घोषणा करावी. मुस्लिम पुरुष फक्त पती नाही, तर तो बाप, मुलगा आणि भाऊही आहे. पतीच्या नात्यातून त्याला बरोबर वाटत नाही, पण बाप आणि भावाच्या भूमिकेतून बरोबर आहे हे त्यांना पटलंय, असेही मोदी म्हणाले. बुधवारी मोदी अकोल्यासह, पनवेल मतदारसंघातील खारघरला प्रचारसभेसाठी येत आहेत. या सभांचेही विरोधकांना टेन्शन असेल.