Breaking News

विवेक पाटील यांची 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

‘ईडी’चा दणका

मुंबई ः प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मोठा दणका बसला आहे. विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनेक अन्य ठिकाणच्या जमिनींचा समावेश आहे.
कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी सर्वप्रथम कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीने आवाज उठवला होता. ठेवीदारांना न्याय मिळून घोटाळेबाजांवर कारवाई व्हावी यासाठी ठेवीदार संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावाही केला. त्याला यश येऊन 529 कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकाप नेते विवेक पाटील यांना जून महिन्यात मुंबई ईडीकडून त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली होती. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर ईडीला कारवाई करावी लागली.
या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार विवेक पाटील सध्या तळोजा कारागृहात आहेत. त्यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारीवर्ग या घोटाळ्याला जबाबदार असल्याचा आरोप आहे. कर्नाळा बँकेत सुमारे 50 हजार 689 ठेवीदारांच्या 529 कोटींच्या ठेवी होत्या. सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग-व्यवसायासाठी या बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांच्या ठेवी उचलून गैरव्यवहार केला, मात्र ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.
रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षक यू. जी. तुपे यांची नियुक्ती करून पुनर्तपासणी केल्यानंतर 63 कर्ज खात्यांद्वारे 512 कोटींचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा 529 कोटींवर गेला आहे. दीड वर्षांपूर्वी ठेवी स्वीकारण्याला व कर्ज वितरणावर निर्बंध आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना नुकताच रिझर्व्ह बँकेने रद्दबातल केला.
गैरव्यवहारातील रकमेतून कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी, चॅरिटेबल ट्रस्ट, महाविद्यालय, शाळा यांची निर्मिती करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. हा संपूर्ण गैरव्यवहार 560 कोटींहून अधिक रुपयांचा आहे. या प्रकरणी विवेक पाटील यांच्याविरोधात ‘ईडी’ने पाच दिवसांपूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, ईडी ज्याप्रमाणे धडक कारवाई करीत आहे तशीच हिंमत राज्य शासनाने दाखवून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीने केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply