Breaking News

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार्‍या या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या या सोहळ्याचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, शैलेंद्र शिर्के, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.
असे आहे बक्षिसांचे स्वरूप
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एक लाख रुपये, व्दितीय क्रमांकास 50 हजार, तृतीय क्रमांकास 30 हजार रुपये आणि तिन्ही विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विशेषांकासाठी 15 हजार रुपये, बालसाहित्य अंकासाठी 7500 रुपये, उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी 15 हजार रुपये, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट मुखपृष्ठ व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह तसेच रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजार रुपये, व्दितीय क्रमांकास 20 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 10 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार त्याचबरोबर आणि उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट कविता, व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply