पेण : प्रतिनिधी
एम. एस. धोनी क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमवर आधुनिक पद्धतीचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी यांनी दिली. स्टेडिअम कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेस पेण न. प.चे सभागृह नेते तथा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार प्रशांत ओक, व्यवस्थापन अधिकारी सुयोग चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी शिबिराची माहिती देताना मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी यांनी सांगितले की, महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमी व अरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना चांगले उच्च दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण मिळावे या हेतूने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी व त्यांचे मित्र माजी क्रिकेटपटू मिहिर दिवाकर यांच्या संकल्पनेतून धोनी क्रिकेट अॅकॅडमीची स्थापना करण्यात आली असून, या माध्यातूनच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, पेण नगर परिषद, पेण स्पोर्ट्स असोसिएशन यांचे सहकार्य आम्हाला लाभले आहे.
या सात दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता पाच हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी 100 खेळाडूंची नोंद होणार असून, दि. 2 जून ते 7 जून पर्यंत सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 4 ते 6.30 असे दोन वर्गात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी प्रशांत ओक 9325367385, सिकंदर हेयात 7033244309 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने पेणची निवड करण्यात आल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.