खालापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वावोशी मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थांचे जातीचे दाखले, रेशनकार्ड विभाजन आणि नवीन नाव नोंदणीसाठी परखंदे आदिवासीवाडीत घेतलेल्या शिबिराला आदिवासी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 200 आदिवासी बांधव सहभागी झाले होते. शिबिरात जातीच्या दाखल्यांची 57 प्रकरणे तर 69 रेशनकार्डवर नोंदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
खालापूरचे पुरवठा निरिक्षक सतिश शिंदे, महसूल सहाय्यक रविकांत वाघपंजे, वावोशी मंडळ अधिकारी तुषार कामत, तलाठी माधव कावरखे, ग्रामसेवक आर. वाय. श्रीखंडे, कोतवाल संकेत मोरे, नरेश भोसले, रूपेश बामणे, ग्रामपंचायत कर्मचारी किशोर सावंत, परेश दळवी, बुरूमकर, धान्य दुकानदार लता मोरे, राजेंद्र भोसले,राजेंद्र जाधव यांच्यासह श्री छत्रपती विद्यालयाचे विद्यार्थी यांनी परखंदे आदिवासीवाडीतील शिबिरात आदिवासी बांधवाना सहकार्य केले.
होराळे ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य
या शिबिरासाठी लागणारी कागदपत्रे ग्रामस्थांना तात्काळ मिळावीत, यासाठी ग्रामपंचायतीचे दप्तर घेऊन ग्रामसेवक व त्यांचे सहकारी दिवसभर उपस्थित होते. ग्रामस्थ राजेंद्र भोसले यांनी शिबिरार्थींसाठी पाणी, चहा व नाष्टा यांची व्यवस्था केली होती.
परखंदे आदिवासीवाडीतील शिबिरात सुमारे 200 व्यक्तींना जातीचे दाखले, रेशनकार्डवरील नवीन नाव नोंदणी, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कमी अशी कामे घराजवळ करून मिळाल्याने त्यांचा तालुक्याला मारावे लागणारे हेलपाटे व पैसे वाचले आहेत.
-राजेंद्र भोसले, ग्रामस्थ, परखंदे, ता. खालापूर